आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुकास्पद:हरिनाम सप्ताहात रोजा इफ्तारची पंगत; बीड जिल्ह्यातल्या पाटोदा गावाने महाराष्ट्राला दिला हिंदू, मुस्लीम भाई-भाईचा संदेश!

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे जाती-जाती आणि धर्माधर्मावरून भांडणे सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरपासून जळगावपर्यंत अनेक ठिकाणी ऐन रामनवमीच्या काळात दंगली उसळल्या. समाजकंटकांनी जाळपोळ झाली. मात्र, अशा अवस्थेतही बीड जिल्ह्यातले पाटोदा हे गाव तुम्हा-आम्हाला साऱ्यांनाच मानवतेच्या धर्माची आठवण करून देत आहे. विशेष म्हणजे त्यासाठी चक्क हरिनाम सप्ताहात रोजा इफ्तारची पंगत ठेवून समाजापुढे हिंदू-मुस्लीम भाई-भाईचा एक आदर्श ठेवला आहे.

पाटोदा गावातही असेच सहुष्णतेचे वातावरण आहे. या उपक्रमाचे राज्यभरात मोठे कौतुक होत आहे. या लहानशा गावापासून आपण बोध घेणार का, हा असा खरा प्रश्न आहे.

मराठवाड्यातले बीड, उस्मानाबाद, लातूर, जालना हे जिल्हे तसे दुष्काळी. 2010 नंतर येथे पडलेले दुष्काळ साऱ्यांना माहित आहेत. चार-चार किलोमीटरव पायपीट करून पाणी मिळायचे नाही. लातूरला तर रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला. याच बीड जिल्ह्यातल्या पाटोदा (ता. अंबाजोगाई) गावाने निर्माण केलेला आदर्श आजच्या काळात खरोखर वाखाणण्याजोगा म्हणावा लागेल.

पाटोदा येथे दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे पारायण होते. यंदाचे हे 29 वे वर्ष आहे. रामनवमी ते हनुमान जन्मोत्सवापर्यंत हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू असतो. या काळात काकड आरती, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम होतात. अनेक महाराज मंडळी या कार्यक्रमांना हजेरी लावून उपदेश करतात. काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होते. या सोहळ्याला गावचे सरपंच, अधिकारी, गावकरी, पंचक्रोशीतले नागरिक आवर्जुन हजेरी लावतात.

एकीकडे यंदा रामनवमीच्या काळात दंगली पेटल्या होत्या. अनेक ठिकाणी जाळपोळ झाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये तर वणवा भडकला, अशीच परिस्थिती होती. येथे समाजकंटकांनी पोलिसांची वाहने जाळली. त्यांची धरपकड अजूनही सुरू आहे. जळगावमध्येही अशी दंगल झाली. या दंगलीचे मास्टरमाइंड कोण, यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले.

मात्र, नेमके याच काळात पाटोदा हे गाव उभ्या महाराष्ट्राला सहिष्णुतेची शिकवण देत होते. सर्व धर्म एक आहेत. आपण त्याचीच लेकरे आहोत, याची जाणीव करून देते होते. येथील हरिनाम सप्ताहात चक्क रोजा इफ्तारच्या पंगतीचे आयोजन करण्यात आले. एका लहानशा गावाने माणुसकीचा धर्म सर्वश्रेष्ठ असतो, असे सांगत समाजकंटकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले. हा बोध उभ्या महाराष्ट्राने घ्यावा, हीच अपेक्षा इथल्या गावकऱ्यांनाय.