आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • BHR Scam Case Updates: Raids In Six Districts Including Aurangabad, 12 Arrested; Three Close Associates Of MLA Girish Mahajan; News And Live Updates

बीएचआर घोटाळा प्रकरण:औरंगाबादसह सहा जिल्ह्यांत छापे, 12 अटकेत; आमदार गिरीश महाजन यांचे तीन निकटवर्तीय गजाआड

जळगाव/ पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्वच माझे निकटवर्तीय : महाजन

कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताच भाईचंद हिराचंद रायसोनी, अर्थात बीएचआर पतसंस्थेतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी पोलिस कारवाईची दुसरी लाट आली आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या १५ पथकांनी गुरुवारी (१७ जून) जळगाव, औरंगाबादसह सहा जिल्ह्यांत सकाळी एकाच वेळी छापे टाकून पतसंस्थेचे मोठे कर्जदार असलेल्या १२ जणांना अटक केली. जळगाव येथील डाळ उद्योजक प्रेम कोगटा, हाॅटेल व्यावसायिक भागवत भंगाळे, भुसावळचे माजी नगराध्यक्ष आसिफ तेली, इथेनाॅल घोटाळ्यातील संजय तोतला, औरंगाबाद येथील पतसंस्थेचे संस्थापक आणि वृत्तपत्राचे संचालक अंबादास मानकापे आणि आमदार गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय तिघे अशा दिग्गजांसह दोन महिलांचाही अटक झालेल्यांमध्ये समावेश आहे.

यातील तिघांना २२ जूनपर्यंत कोठडीत ठेवण्याची परवानगी पोलिसांना मिळाली असून इतरांना शुक्रवारी पुणे न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. या प्रकरणातील पहिली धडक कारवाई पुणे पोलिसांनी २५ नोव्हेंबर २०२० रोजी केली होती. जळगाव शहरातून त्या वेळी सहा जणांना अटक करण्यात आली होती. दोन चार्टर्ड अकाउंटंटसह मध्यस्थ आणि व्यापाऱ्यांचा त्यात समावेश हाेता.

त्याच वेळी गुन्हा नोंदवण्यात आलेले व्यावसायिक सुनील झंवर आणि तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे यांना अटक करण्यात मात्र पोलिसांना अजून यश आलेले नाही. त्या अटक सत्रानंतर कारवाई काहीशी थंडावल्याचे वाटत असतानाच गुरुवारी सकाळी सहा वाजता कारवाईचा दुसरा टप्पा सुरू झाला. यात पहिल्यांदाच मोठ्या कर्जदारांना पोलिसांकडून अटक झाली आहे. त्यामुळे इतर कर्जदारांनाही धडकी भरली आहे.

तीन आरोपींना ६ दिवस पोलिस कोठडी
दरम्यान, अंबादास मानकापे, जयश्री तोतला आणि प्रेम कोगटा यांना गुरुवारी सायंकाळीच पुणे न्यायालयासमोर उभे करण्यात आले. मानकापे व काेगटा या दोघांनी प्रत्येकी सव्वादोन कोटी रुपये, तर जयश्री तोतला हिने १ कोटी ३४ लाख रुपये कर्ज फेडण्यासाठी ठेवीदारांच्या पावत्या वापरल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. त्यांना न्यायाधीश नांदेडकर यांनी सहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याची परवानगी दिली. सरकार पक्षातर्फे अॅड. प्रवीण चव्हाण यांनी, तर त्रयस्थ अर्जदारांकडून अॅड. अक्षता नायक यांनी काम पाहिले.

आमदार महाजनांचे निकटवर्तीय
जामनेरचे भाजपचे आमदार माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या तीन निकटवर्तीयांचा अटक करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे. जितेंद्र पाटील यांच्या पत्नी जामनेर पालिकेत भाजपच्या नगरसेविका आहेत. ते स्वत:ही भाजपच्या कृषी सेलचे माजी तालुकाध्यक्ष आहेत. आमदार महाजन आणि महापालिकेशी संबंधित अनेक निर्णयांत जितेंद्रचा सहभाग असतो. छगन झाल्टे हेदेखील आमदार महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. राजेश लोढा तळेगावचे माजी सरपंच आहेत.

सर्वच माझे निकटवर्तीय : महाजन
दरम्यान, जामनेरातील निकटवर्तीयांना अटक झाल्याबद्दल आमदार गिरीश महाजन यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता, तेच काय सर्वच माझे निकटवर्तीय आहेत, असे ते म्हणाले. त्यांनी घेतलेले कर्ज परत केले आहे. तरीही ही कारवाई होते आहे. कायद्यानुसार जे व्हायचे ते होत राहील, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...