आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Billions Of Years Ago, The Sea Was In Vidarbha, After Three Years Of Research, Pvt. Suresh Chopra Claimed; News And Live Updates

वणीत सापडली पहिल्या सजीवांची जीवाश्मे:कोट्यवधी वर्षांपूर्वी विदर्भात होता समुद्र, तीन वर्षांच्या संशोधनाअंती प्रा. सुरेश चोपणे यांनी केला दावा

वणी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • क्रिटाशिअस काळात भूगर्भीय घडामोडीमुळे समुद्र गेला दूर

यवतमाळ जिल्ह्यातील वणी परिसरातील मोहुर्ली आणि बोर्डा येथे अनेक वर्षांपूर्वी झालेल्या भूकंपाचा अभ्यास करताना संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांना पृथ्वीवरील पहिल्या सजीवांची जीवाश्मे आढळून आली. गेल्या तीन वर्षांपासून ते परिसरात अभ्यास करत असून विदर्भात दीडशे ते दोनशे कोटी वर्षांपूर्वी समुद्र असल्याचा दावा त्यांनी संशोधनानंतर केला आहे. प्रा. सुरेश चोपणे यांचे मूळ गाव वणी असून ते संशोधनानिमित्त चंद्रपूर येथे स्थायिक झाले आहेत. ते भारतीय विज्ञान कॉँग्रेस कोलकाताचे सदस्य, मराठी विदर्भ संशोधन संस्थेचे सदस्य, त्याचप्रमाणे पर्यावरण आणि खगोल शास्त्र संस्थेचे अध्यक्ष असून भूशास्त्र आणि पुरातत्व विषयावर अनेक वर्षांपासून वणी आणि चंद्रपूर परिसरात नियमित संशोधन करीत आहेत. १५ वर्षांपूर्वी वणी परिसरातील बोर्डा येथे झालेल्या भूकंपाचा अभ्यास केला. यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात ५ ठिकाणी पाषाणयुगीन स्थळे तर ४ ठिकाणी कोट्यवधी वर्षापूर्वीची शंख-शिंपल्यांची जीवाश्मे शोधून काढली.

पृथ्वीची उत्पत्ती ४.६ अब्ज वर्षापूर्वी झाली असून परंतु सजीवांची उत्पत्ती मात्र ३ ते ४ अब्ज वर्षादरम्यान झाली. जगात काही ठिकाणीच असे जीवाश्म सापडले आहेत, त्यांना स्ट्रोमाटोलाईट असे म्हणतात. ह्या सूक्ष्मजीवांना सायनो बॅक्टेरिया असे म्हणतात. विदर्भातील चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात १५० ते २०० कोटी वर्षाच्या निओ प्रोटेरोझोईक काळात तयार झालेल्या चुनखडकात हे जीवाश्मे आढळतात. समुद्राच्या उथळ उष्ण पाण्यात तयार झालेल्या चिखलात हे जीवाणू विकसित झालेले अाहेत. पृथ्वीवर प्रथम विकसित झालेले जीव हे सर्व आदीजीव खनिजे खाऊन जगत होते. पुढे अशाच जीवांपासून बहूपेशीय जीव विकसित होत गेले. मासोळ्या, सरपटणारे जीव, विशाल आकाराचे डायनॉसोर ते पुढे मानव असा सजीवांचा विकास झाला.

चंद्रपूर आणि वणी परिसरात चांदा, बिल्लारी आणि पैनगंगा ग्रुपच्या चुनखडकात स्ट्रोमेटोलाईटची जीवाश्मे आढळली. यवतमाळ जिल्ह्यातील वणी जवळील मोहुर्ली, बोर्डा परिसरातील चुनखडकात आढळलेली ही अतिशय महत्त्वाची स्ट्रोमाटॉलाइटची जीवाश्मे प्रथमच आढळली आहेत. गेल्या ३ वर्षापासून प्रा. चोपणे हे जीवाश्माच्या शोधत होते. प्रथम ऑस्ट्रेलियामध्ये ही जीवाश्मे मोठ्या प्रमाणावर आढळली होती. भारतात भोजुन्दा राजस्थान, चित्रकुट, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे आढळली आहेत.

क्रिटाशिअस काळात भूगर्भीय घडामोडीमुळे समुद्र गेला दूर
संशोधनात आढळलेली जीवाश्मे चिखलात गोल आकाराची गुंडाळी करून समूहाने राहत होती. दीडशे ते दोनशे कोटी वर्षांपूर्वी विदर्भात समुद्र होता. क्रिटाशिअस काळात भूगर्भीय घडामोडीमुळे समुद्र दूर गेला व चिखलांचे रूपांतर चुनखडकात झाले व जीवांचे रूपांतर जीवाश्मात झाले. आजही करोडो वर्षानंतरही चुनखडकात सजीवांच्या प्रतिमा स्पष्ट दिसतात. या चुनखडकामुळे परिसरात पूर्वी समुद्र होता, असा दावा प्रा. चोपणे यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...