आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्स्पाेज:नांदेड, हिंगोलीतील कोंबड्या रात्रीतून गायब, काही प्रतिबंधित क्षेत्रातून पक्षी विक्री

नांदेड/हिंगोली : शरद काटकर/मंगेश शेवाळकर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली जिल्ह्यात १० फूट खड्ड्यात कोंबड्या पुरल्या - Divya Marathi
हिंगोली जिल्ह्यात १० फूट खड्ड्यात कोंबड्या पुरल्या
  • नोंद 760 कोंबड्यांची, नष्ट करताना दिसल्या फक्त 187

इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रावर बर्ड फ्लूचे सावट आहे. ज्या भागात बर्ड फ्लूमुळे कोंबड्या व पक्षी मृतावस्थेत सापडत आहेत अशा ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र लागू करून याचा संसर्ग रोखण्यासाठी एक किलोमिटरच्या परिसरातील पक्षी नष्ट करण्याची उपाययोजना केली जाते. परंतु नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील काही भागात प्रतिबंधित क्षेत्रात मात्र रातोरात शेकडो कोंबड्याची वाहतूक होत असल्याचे स्पष्ट होत आहे. याची नांदेडमध्ये ४ तर हिंगोली जिल्ह्यात १ उदाहरण ‘दिव्य मराठी’च्या पाहणीत समोर आले. संसर्गाचा धोका लक्षात घेऊन काही कुक्कुटपालन व्यावसायिक प्रामाणिकपणे त्यांच्याकडील प्रत्यक्ष कोंबड्या नष्ट करण्यात पुढाकार घेत आहेत. पण काही ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्रात पशुसंवर्धनचे अधिकारी कोंबड्या नष्ट करण्यास गेल्यानंतर नोंदणीच्या तिपटीने कमी कोंबड्या नष्ट करण्यासाठी त्यांच्याकडे सोपवत असल्याचे दिसते.

बर्ड फ्लू रोखण्यासाठी प्रशासनाच्या स्तरावर प्रतिबंध लादले जात आहेत. या अंतर्गत प्रतिबंधित क्षेत्रातील पक्ष्यांची वाहतूक करण्यास सक्त मनाई आहे. पण जिल्ह्यात काही ठिकाणी या पक्ष्यांची वाहतूक केली जाण्याचा दाट संशय निर्माण होतो. बर्ड फ्लूचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रतिबंधित क्षेत्रात पक्ष्यांची आकडेवारी जास्त असताना पशुसंवर्धन विभागाची टीम पक्षी नष्ट करायला गेल्यानंतर काही ठिकाणी तिपटीने कमी पक्षी सोपवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकारामुळे पशु संवर्धन विभागही पुरता वैतागला असून पक्ष्यांची विक्री करू नये, असे आवाहन पशु संवर्धन अधिकारी करत आहेत.

नांदेड जिल्ह्यात पापुलवाडी (ता.माहूर), नावंद्याचीवाडी, चिखली (ता.कंधार), चेनारा (ता.किनवट) या ठिकाणी बर्ड फ्लूचा पॉझिटिव्ह अहवाल आला. दरम्यान, पशुसंवर्धन विभागातर्फे एक किलोमीटर अंतरावरील पक्षी, अंडी नष्टी करण्यात येत आहेत. तत्पूर्वी प्रशासनाकडून बाधित गावातील पक्ष्यांचे ३३ पक्ष्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येते. मात्र सर्वेक्षणावेळी आणि प्रत्यक्ष कोंबड्या नष्ट करायला गेल्यानंतरच्या आकडेवारीत प्रचंड तफावत दिसून येत आहे.

नोंद 760 कोंबड्यांची, नष्ट करताना दिसल्या फक्त 187
हिंगोली जिल्ह्यातील पिंपरी खुर्द परिसरातील १८७ कोंबड्या मारून सुमारे १० फुट खोल खड्ड्यात शुक्रवारी ता. २२ दुपारी पुरण्यात आल्या. यावेळी पोलिस बंदोबस्त देखील होता. त्यानंतर आता या परिसरात सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
पिंपरी खुर्द येथील २९ कोंबड्या बर्ड फ्लू मुळे दगावल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पशुसंवर्धन विभागाची तातडीने बैठक घेऊन १ किलो मीटर परिसर संक्रमित झोन तर १० किलो मीटर परिसरात सर्वेक्षण झोन जाहिर केले होते. तसेच पुढील ९० दिवसांपर्यंत कोंबड्या व अंडी यांची वाहतूक बंद केली होती.

त्यानंतर आज पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ. एस. एल.पवार यांच्या पथकाने पिंपरी खुर्द येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक रविकांत हुंडेकर, जमादार संजय मार्के यांचीही उपस्थिती होती. यावेळी गावातील सर्व कोंबड्या ताब्यात घेऊन त्यांना मारण्यात आले. दरम्यान, पिंपरी खुर्द येथे १६ रोजीच्या सर्वेक्षणात ७६० कोंबड्या असल्याचे स्पष्ट झाले मात्र प्रत्यक्षात केवळ १८७ कोंबडया आढळून आल्याने शनिवारी ता. २३ पशुसंवर्धन विभागाच्या पाच पथकातील २५ कर्मचाऱ्यांमार्फत कोम्बिंग ऑपरेशन केले जाणार असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एल. एस. पवार यांनी सांगितले.

खरी माहिती विभागाला द्या
कळमनुरी तालुक्यातील पिंपरी खुर्द गावामध्ये संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. कृष्णापूर येथील कोंबड्या दगावल्या असून त्याचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. ग्रामीण भागातून या संसर्गात होऊ नये यासाठी कोंबडीपालन करणाऱ्यांनी खरीखुरी माहिती पशुसंवर्धन विभागाला द्यावी. तरच बर्ड फ्लू रोखता येईल. जितेंद्र पाईकराव, कुक्कुटपालन व्यावसायिक, कृष्णापूर जि. हिंगोली.

हेराफेरी होत असल्याचा हा घ्या पुरावा : नोंदवल्या १६२७ कोंबड्या, प्रत्यक्षात सोपवल्या ६४०
पशुसंवर्धन विभागाच्या सर्वेक्षणात नावंद्याचीवाडी येेथे १ हजार ६२७ पक्षी नोंदवले होते. परंतु, प्रत्यक्षात ६४० पक्षी पथकाला मिळाले. चिखलीतही ९६७ पक्षी असल्याचे नोंदवले होते, प्रत्यक्षात ३१४ पक्षी आढळले. याशिवाय झनकवाडी (ता.किनवट) येथे ४०० कोंबड्या मृत झाल्याचे सांगितले. प्रत्यक्षात एकही पक्षी पथकाला आढळला नाही. आमदरी (ता.भोकर) येथे ४०० ते ४५० कोंबड्या मृत झाल्याचे सांगितले होते. या ठिकाणी पथकाला एक ते दोन पक्षी मृत आढळले.

प्रतिबंधित क्षेत्रातील पक्ष्यांची विक्री करू नये
व्यावसायिकांनी प्रतिबंधित क्षेत्रातील पक्ष्यांची विक्री करू नये. तसेच चुकीची माहिती देऊन दिशाभूल न करता प्रशासनाला सहकार्य करावे. बर्ड फ्लूचा मानवाला अपाय होत नसून काळजी घ्यावी. डॉ. अरविंद गायकवाड, सहायक जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, नांदेड.

बातम्या आणखी आहेत...