आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाविकास आघाडीवर टीकास्त्र:तीन पक्षाचं सरकार…  “खाटांची” रोज कुरकुर, एक बाजू झाकली की दुसरंच काहीतरी उघडं पडत, आशिष शेलारांचा निशाणा 

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या महाविकास आघाडीमध्ये कुरबुर असल्याच्या चर्चा सुरू आहे. विरोधकांकडून सातत्याने महाविकास आघाडीत ताळमेळ नसल्याचे बोलले जात आहे. यावरुन आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. तीन पक्षाचं सरकार… “खाटांची” रोज कुरकुर…समजूत काढायला रोज धावपळ…एक बाजू झाकली की दुसरंच काहीतरी उघडं पडत.. असा टोला शेलार यांनी लगावला आहे. 

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या सरकारवर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात असते. या सरकारमध्ये मतभेद असल्याचे बोलले जाते. सध्या लॉकडाऊनच्या नियमांमुळे महाविकास आघाडीत मतभेद असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. राज्यात अनेक ठिकाणी अचानक लावलेली टाळेबंदी, समन्वय समितीच्य बैठका न घेणे आणि 2 किमी अंतरात वावरण्याच्या तुघलकी निर्णयावर पवार यांनी ठाकरे यांचे कान टोचल्याचे वृत्त होते. यावरुनच आशिष शेलार यांनी राज्य सरकारला हा टोला लगावला आहे. 

यासोबतच एटीकेटीच्या परिक्षांची आठवणही या ट्विटच्या माध्यमातून आशिष शेलारांनी करुन दिली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांच्या व्यावसायिक आणि कला, विज्ञान, वाणिज्य आदी पारंपरिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेणे सध्या शक्य नाही. त्यामुळे या परीक्षा न घेण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तो निर्णय जाहीर केला. परंतु ‘एटीकेटी’च्या विद्यार्थ्यांसंदर्भात कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारला चिमटा काढला आहे. 

आशिष शेलारांनी ट्विट केलं की, तीन पक्षाचं सरकार… “खाटांची” रोज कुरकुर…समजूत काढायला रोज धावपळ…एक बाजू झाकली की दुसरंच काहीतरी उघडं पडत..सगळाच तीन तिघाडा आणि काम बिघाडा.. या गदारोळात सरकारला विद्यार्थ्यांचा विसर पडू नये म्हणून हे स्मरण! आमच्या ATKT च्या विद्यार्थ्यांचा निर्णय अजून बाकी आहे!! असं आशिष शेलार यांनी ट्विट केलं आहे.

0