आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाविकास आघाडीची विस्कटलेली घडी, संघाच्या माध्यमातून भाजपने राबवलेली प्रचार यंत्रणा, प्रत्येकाला जबाबदारी देऊन ती पूर्ण करून घेण्याचे श्रेष्ठींचे कसब आणि गतवेळच्या मतविभाजनाचा घेतलेला बोध यामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारली.
स्थानिक मुद्द्यांसह राज्यातील जिव्हाळ्यांच्या प्रश्नांचा खुबीने प्रचारात वापर झाला. मतदानाच्या तोंडावर वीकेंड लॉकडाऊनच्या निर्णयाविरोधात जनतेचे लक्ष वेधल्याचा परिणामही मतदानावर झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपला कमळ फुलवणे शक्य झाले. याउलट उमेदवारी देताना झालेली चूक, मतदारसंघाकडे वरिष्ठ नेत्यांचे झालेले कमालीचे दुर्लक्ष, मतदारसंघात पक्षाच्या अनुभवी-जाणकार नेत्यांची वानवा राष्ट्रवादीच्या पराभवाला कारणीभूत ठरली. कारण, राष्ट्रवादीकडे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फळी विस्कटलेली दिसली. प्रचारात महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांनी खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या भाषणबाजीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (स्व) आमदार भारत भालकेंच्या उत्तराधिकाऱ्यांना विजय मिळवता आला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदींनी भाजप उमेदवारासाठी प्रतिष्ठा पणाला लावली.
प्रारंभी दिवंगत भारत भालकेंच्या सहानुभूतीमुळे निवडणूक एकतर्फी होणार असे चित्र होते. वीज बिल माफी व बिल न भरल्यामुळे वीज तोडणी, शेतकरी कर्जमाफी, अवकाळी महापुराचे अनुदान आदी कळीच्या मुद्द्यांचा आधार घेऊन विरोधकांनी रणांगण भाषणांनी गाजवले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या आजवरच्या राजकीय कारकीर्दीत पंढरपूर-मंगळवेढ्याला जेवढ्या वेळी भेटी दिल्या नाहीत तेवढ्या भेटी देऊन मुक्काम ठोकला होता. तरीही विजय खेचून आणण्यात त्यांना अपयश आले. विठ्ठल कारखान्याची ढासळलेली आर्थिक स्थिती, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी नियुक्तीवरून ऐन निवडणुकीच्या तोंडावर उफाळून आलेला वाद यावरही समाधानकारक तोडगा त्यांना काढता आला नाही, असेही चित्र या वेळी होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.