आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आरोपींना फाशीची शिक्षा:चिखली येथील बलात्कार प्रकरणातील दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चिखली येथील एका 9 वर्षीय मुलीस पळवून नेवून तिच्यावर अत्याचार करुन जबर जखमी करणाऱ्या सागर विश्वनाथ बोरकर व निखील लिंबाज गोलाईत या दोन आरोपींना विशेष न्यायाधीश चित्रा एम. हंकारे यानी दोषी धरून फाशीची शिक्षा आज (दि.13) रोजी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 27 एप्रिल 2019 रोजी रात्री अंदाजे एक ते दोन वाजेच्या सुमारास आरोपींनी अल्पवयीन मुलीला स्कुटीवरुन पळवून नेले आणि स्मशानभूमी समोरील मोकळ्या जागेत आळी-पाळीने बलात्कार केला होता. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडलांनी त्याच दिवशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन पोलिसांनी उपरोक्त दोन्ही आरोपीविरुध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते.

या प्रकरणाचा प्राथमीक तपास ठाणेदार गुलाबराव वाघ यानी केला. त्यानंतरचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी बाबुराव महामुनी यांनी केला. यासाठी पोलिस कर्मचारी शरद गिरी व महिला पोलिस कर्मचारी ज्योती मुळे यांनी सहकार्य केले. तपासाअंती दोषारोप पत्र येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने मुलीस पळवून नेतांना साक्षीदार शिवाजी साळवे, पंच शुभम भालेराव, वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कदम, डॉ. विजय खरपास, डॉ. मनिषा चव्हाण, डॉ. नुतन काळे, तसेच औरंगाबाद येथील तज्ञ डॉ. विजय कल्याणकर, डॉ. संजय पगारे, जात प्रमाणपत्रावरील साक्षीदार रवी टाले, राजू देशमुख , नायब तहसिलदार कुणाल झाल्टे, तपास अधिकारी गुलाबराव वाघ , उपविभागीय पोलीस अधिकारी महामुनी या साक्षीदारासह पीडीत मूलीचा पुरावा नोंदवण्यात आला.

साक्षी पुरावे हे घटनेला पुरक व एकमेकाशी सुसंगत असल्याने पीडित मुलीवर आरोपींनी बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले. प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील ॲड. वसंत भटकर, ॲड. सोनाली सावजी यांनी काम पाहिले. यासाठी त्यांना पैरवी म्हणून पोलिस कर्मचारी सुनील पवार यानी सहकार्य केले. पीडित मुलीला महिला व बालकल्याण सदस्य किरण राठोड यांनी सहकार्य केले.

0