आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'हनुमान चालीसा'चा आधार घेऊन महाराष्ट्रातील काही विरोधक राज्याला तसेच मुंबईला तोडून पाहत आहे. मात्र, त्यांचे हे राजकारण यशस्वी होणार नाही. शिवसैनिकांना डोके थंड ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री संयमी आहेत, त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. असा प्रतिहल्ला मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. भोंगा वादावरून त्यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
विरोधकांचे 'नापाक इरादे' मुंबईत चालु देणार नाही. आमच्या कडून काहीतरी घडावे यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र, आता तसे होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना विचार करण्याचे तसेच डोके शांत ठेवण्याचे आदेश दिले आहेत, असेही पेडणेकर म्हणाल्या. भोंग्यांच्या आवाहनानंतर गावा गावातले भजन, काकडा आरतीचे भोंगे देखील उतरवले गेले. हे हिंदूा नष्ट करण्याचे काम आहे, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.
राज ठाकरे यांच्यावरही टीका
मागील भाषणामध्ये भोंग्यांवर उपस्थित केलेल्या मुद्दावर त्यांना बॅकफूटवर जावे लागले, त्यामुळे ते आता पवार साहेबांवर बोलत असल्याची टीका किशोरी पेडणेकर यांनी केली. बाबरी पाडली तेव्हा मुख्यमंत्री कुठे होते? हा प्रश्न मूर्खपणाचा असल्याचे त्या म्हणाल्या. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर होते आणि मातोश्रीवर होते, असे उत्तर देखील त्यांनी दिले. बाबरी पाडली त्यावेळेस विरोधकांची पळता भुई थोडी झाली होती मात्र, बाळासाहेबांनी ठणकावून बाबरी शिवसैनिकांनी पडली असल्याचे सांगितले, त्यावेळी तुम्ही का गप्प बसला असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
अनेकांच्या डोक्यात 'केमिकल लोचा'
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना विचित्र स्वप्नदोष झाला आहे. मुन्नाभाई चित्रपटात दाखवल्याप्रमाणे त्यांच्या डोक्यात 'केमिकल लोचा' झाला असल्याचा आरोपही पेडणेकर यांनी केला. यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्यावर देखील टीका केली. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे होते म्हणूनच तुम्ही मुख्यमंत्री झाला, असा टोला त्यांनी नारायण राणे यांनी लगावला. नारायण राणे यांना बाळासाहेबांआधी उद्धव ठाकरेंनाच रिपोर्टिंग करावे लागत होते, असे देखील त्या म्हणाल्या. मात्र आता त्यांच्या चश्मा आणि कानाची मशीन बिघडली आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.