आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत सिंह प्रकरण:केंद्र सरकारने नेमलेल्या तपास यंत्रणेने आत्तापर्यंतच्या तपासात काय दिवे लावले, हे तर काही दिसून आले नाही- शरद पवार

पंढरपूर8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'काहीही झाले तरी राज्यातील आमचे सरकार पाच वर्षे टिकणार'

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी केंद्र सरकारने नेमलेल्या तपास यंत्रणेने आत्तापर्यंतच्या तपासात काय दिवे लावले, हे तर काही दिसून आले नाही. त्याचा प्रकाश देखील कुठे पहायला मिळाला नाही. एकंदरीतच देशाचे लक्ष इतर ठिकाणी वळवण्याचा केंद्र सरकारचा हा प्रयत्न असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली.

शरद पवार यांच्याशी अत्यंत घनिष्ठ संबंध असलेल्या माजी आमदार सुधाकर परिचारक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजुबापू पाटील यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. त्यामुळे शरद पवार यांनी या दोन्ही कुटुंबीयांची सात्वंनपर भेट आज घेतली. त्या नंतर आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भारत भालके, माजी आमदार दीपक साळुंखे आदी त्यांच्या बरोबर उपस्थित होते.

या वेळी बोलताना पवार म्हणाले, अभिनेता सुशांतसिंह राजपुत आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करीत होते. मात्र मुंबई पोलिसांच्या तपासावर केंद्र सरकारचा विश्वास नसावा. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या एजन्सीकडे हा तपास सुपुर्त केला अशी शंका उपस्थित होतं आहे. मुख्य तपास सोडून आता सर्व काही भलतीकडे चालले आहे. त्यामुळे ज्यावेळी सत्य बाहेर येईल त्याच वेळी सर्व काही कळेल असेही पवार म्हणाले.

राऊत फडणवीस भेटीवर प्रतिक्रिया

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार संजय राऊत यांच्या भेटी बद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार यांनी सांगितले की, या भेटीला राजकीय अर्थ लावणे योग्य नाही. कारण संजय राऊत हे संपादक आहेत. त्यांनी प्रथम माझी मुलाखत घेतली. त्याच वेळी त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि भाजपच्या नेत्यांची मुलाखत घेण्याचे स्पष्ट केलेले होते. त्या प्रमाणे भेट झाली. त्यांच्या भेटी बद्दल अन्य तर्क विर्तक करणे चुकीचे आहे. कारण काहीही झाले तरी राज्यातील आमचे सरकार पाच वर्षे टिकणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दोन्ही राजेंना कोपरखळी

मराठा आरक्षणा बद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, खासदरकीसाठी छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे यांची भाजपाने नियुक्ती केली असल्याने भाजपाचीच ते भाषाच बोलणार. त्यामुळे या दोन्ही राजांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपाकडूनच सोडवून घ्यावा अशी कोपरखळी त्यांनी केली. खासदार रामदास आठवले यांच्या पक्षाचा एकही आमदार व खासदार नाही. त्यांचे बोलणे सभागृहात आणि बाहेर देखील गांभीर्याने घेतले जात नाही असेही पवारांनी सांगितले.

कृषी विधेयक येण्यापूर्वीही शेतकऱ्यांना त्यांचा मालक इतर ठिकाणी विक्री करता येत होता. कृषी विधेयकाला सर्वस्तरातून विरोध होत आहे. सर्व मिळून या विधेयकाला विरोध करणार आहेत मात्र याचे नेतृत्व कोणी एकटा न करता शेतकरीच करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...