आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऐन लोकसभा निवडणुकीच्या चार महिने आधी अमोल कोल्हे यांना भाजपमध्ये यावे वाटू शकते. त्यावेळी त्यांना विद्यमान खासदार म्हणून तिकीट द्यावेच लागेल, असे वक्तव्य करून कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी धमाल उडवून दिली आहे.
खासदार अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा यापूर्वी रंगल्या होत्या. ही चर्चा शांत होते न होते, तोपर्यंत चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने पुन्हा एकदा कोल्हे खरेच भाजपच्या वाटेवर आहेत का, याची कुजबुज सुरू आहे.
अशी चर्चा सुरू...
खासदार अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा फेब्रुवारी महिन्यातही रंगली. विधान परिषदेच्या निवडणुकीत कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूरमध्ये बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचार सभेला हजेरी लावली. त्यामुळे या चर्चेला सुरुवात झाली. आता चंद्रकांत पाटील यांनी एका दूरचित्रवाहिनीला मुलाखत देताना अमोल कोल्हे यांच्या संदर्भात एक वक्तव्य केले.
पाटील म्हणाले की...
भाजपचे दिग्गज नेते आणि शिंदे सरकारमधले कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील एका मुलाखतीत आधी भाजप आणि शिंदे गटातल्या कळीच्या जागावाटपच्या मुद्यावर भाष्य केले. ते म्हणाले, आता शिंदे गटाकडे 49 चे संख्याबळ आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांना तितक्याच जागा मिळतील, असे चंद्रशेखर बावनकुळे यांना म्हणायचे नव्हते. त्यावर बैठका होतील. सर्वे केले जातील. लगेच निर्णय शक्य नाही.
दोन उदाहरणे दिली...
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, येणाऱ्या काळात नवीन माणसे येतील. लोकसभा निवडणूक मार्चमध्ये सुरू होईल. ती सहा टप्प्यात होईल. त्याची जानेवारीत चर्चा सुरू होईल. त्यात हातकणंगले आणि शिरूरसारख्या मतदार संघाचे त्यांनी उदाहरण दिले. या मतदारसंघांचे काय करायचे, हे विषय चर्चेला येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
असा दिला इशारा...
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, 2019 मध्ये शिरूर येथून आढळराव पाटील निवडणूक लढले. त्यांना अमोल कोल्हे यांनी पाडले. आता समजा अमोल कोल्हेंना लोकसभा निवडणुकीच्या चार महिने भाजपमध्ये यावे वाटले, तर आम्हाला त्यांना तिकीट द्यावेच लागेल. ते विद्यमान खासदार आहेत. त्यानंतर विषय येईल की ते कुणाकडून लढणार? शिंदेंकडून की भाजपकडून? मग त्यांना विचारले जाईल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
पूर्वाश्रमीचे शिवसैनिक...
लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ 4 खासदार निवडून आले. त्यात शिरूर येथून अमोल कोल्हे यांचा समावेश होता. पेशाने डॉक्टर असलेले अमोल कोल्हे रंगभूमी आणि चित्रपट भूमीवर रमतात. त्यांचा पिंड कलावंताचा आहे. विशेष म्हणजे 2014 च्या निवडणुकांपूर्वी अमोल कोल्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. ते शिवसेनेचे स्टार प्रचारकही होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.