आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

टीकास्त्र:'महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज'- चंद्रकांत पाटील

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानातील सत्ता नाट्यावरुन महाराष्ट्रात सरकार पाडापाडीच्या चर्चा सुरू आहेत. मागील काही दिवसांपासून यावरून राजकीय पक्षांमध्ये शाब्दिक बाचाबाची झालेली दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर 'राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज आहे', असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. चंद्रकांत पाटील एका वृत्त वाहिनीशी बोलत होते.

यावेळी पाटील म्हणाले की, 'महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज आहे. सरकार आता पडेल की नंतर या भीतीने त्यांना झोप येत नसेल. पण तुम्ही सरकार चालवा, आम्ही ते पाडण्यासाठी प्रयत्न करणार नाही', अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी दिली.

तसेच, पुढे ते म्हणाले की, 'मागासवर्गीय आयोगाचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. सात महिन्यांपासून आयोगाचे ऑफिस बंद आहे. मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना हे ऑफिस बंद असणे चुकीचे आहे.;

यावेळी भाजपच्या आंदोलनाबाबत बोलताना पाटील म्हणाले की,'दूध दरवाढीसाठी भाजप 1 ऑगस्टला आंदोलन करणार आहे. त्याची तयारी सुरू आहे. रासप, रयत क्रांती, रिपाइं या आंदोलनात सहभागी होणार आहेत. आमचे आंदोलन हिसंक नसेल,' अशी माहिती पाटील यांनी दिली.

'शेतकऱ्यांचा नेता आमदारकी मिळणार कळाल्यावर शांत'

काही दिवसांपूर्वीच दूधाच्या दरावरून चंद्रकांत पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर टीका केली होती. 'दुध उत्पादकांसाठी कायदा हातात घेण्याची तयार दर्शवणारे राजू शेट्टी कधी आंदोलन करणार आहेत, हे आम्हाला पाहायचं आहे. शेतकऱ्यांचा नेता म्हणून घेणार आज आमदारकी मिळणार असल्याचे समजताच शांत बसले आहेत” असा टोला पाटील यांनी शेट्टी यांना लगावला आहे.