आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआमच्या सगळ्या नेत्यांनी जिभेवर संयम ठेवावा. त्यामुळे आघाडी मजबूत होईल, असा सल्ला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिला. मात्र, त्यांनी वडेट्टीवारांचा बंद खोलीत निर्णय करू म्हणत आगपाखड केली.
महाविकास आघाडी आणि विशेषतः काँग्रेसमधली कुरबुर मंगळवारी अशी चव्हाट्यावर पाहायला मिळाली. तर पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडीत मिठाचे खडे टाकू नयेत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी लगावला.
काय म्हणाले भुजबळ?
संजय राऊत यांनी शरद पवारांचा राजीनामा ते अजित पवारांची नाराजी यावर आतापर्यंत वारंवार भाष्य केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांनीही आज संजय राऊतांना फटकारले. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना लक्ष केले. ते म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आघाडीची सत्ता का गेली. जोपर्यंत काँग्रेसचे सोनिया गांधी, राहुल गांधी, शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार हे जोपर्यंत एकत्रित आहेत. तोपर्यंत कोणी काही बोलले, तर त्याकडे फार लक्ष द्यायचे कारण नाही. आपल्या नेत्यांनी ज्या प्रमाणे ठरवले आहे, त्याप्रमाणे खालच्या लोकांना काम करायचे आहे. त्याच्यामध्ये कोणी मिठाचे खडे टाकू नयेत, असा टोला त्यांनी चव्हाणांना हाणला. तसेच एकनाथ शिंदे सरकारने अवकाळी पावसाची नुसती पाहणी करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या पदरात ठोस रक्कम पडली पाहिजे. याच्यासाठी पावले उचलली पाहिजेत, असे आवाहन केले.
काय म्हणाले वडेट्टीवार?
विजय वडेट्टीवार म्हणाले की, लिहिताना, बोलताना भान ठेवावे. भान ठेवून बोलावे. भान ठेवून लिहावे. तोडण्याची भाषा करू नये. जोडण्याची भाषा प्रत्येकाने करावी. महाविकास आघाडीचे भविष्य उज्ज्वल असल्याचे त्यांनी सांगितले. वडेट्टीवारांच्या टीकेचा रोख नाना पटोले यांच्यावर असल्याचे समजते.
फेव्हिकॉल लावत जावू
विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, येणारे सरकार महाविकास आघाडीचे असणार आहे. कितना भी जोर लगाले, ये टुटने वाला नही है. थोडे ढिले झाले तरी पुन्हा फेव्हिकॉल लावत जावू. जोडत जावू. त्यामुळे महाविकास आघाडीच्या कोणत्याही विरोधकांनी चिंता करण्याचे कारण नाही.
पटोलेंचे उत्तर
प्रसारमाध्यमांनी विजय वडेट्टीवारांच्या सल्ल्याबद्दल नाना पटोले यांना विचारले. तेव्हा ते आक्रमक झाले. इतकेच नव्हे, तर वडेट्टीवारांचा बंद खोलीत निर्णय करू. ते एवढे मोठे नाहीत की, त्यासाठी मी इथे उत्तर दिले पाहिजे, अशी आगपाखडही त्यांनी केली.
संबंधित वृत्तः
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.