आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआखाडा बाळापूर ते डोंगरकडा मार्गावर जामगव्हाण पाटीजवळ रायपूर (छत्तीसगड) येथून सोलापूरकडे कामासाठी जाणाऱ्या कामगारांची खाजगी बस उलटून झालेल्या अपघातात १५ कामगार जखमी झाले आहेत. सोमवारी ता. ३ पहाटे पाच वाजता हा अपघात झाला आहे. जखमींना नांदेड येथील शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले असून एका कामगाराची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,रायपूर (छत्तीसगड) येथून सुमारे ६० कामगार कामासाठी सोलापूर येथे खाजगी बसने (क्र.सीजी -०८-एएल- ६०२५) जात होते. आखाडा बाळापूर ते डोंगरकडा मार्गावर जामगव्हाण पाटीजवळ पहाटे पाच वाजता वळण रस्त्यावरून बस पुढे घेत असतांना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन बस उलटली. त्यामुळे पहाटे साखर झोपेत असलेल्या कामगारांमध्ये एकच गोंधळ उडाला.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक बालाजी पुंड, जमादार शेख बाबर, भगवान वडकिले, चालक भारत मुलगीर, गजानन मुटकुळे ,डाखोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने दोन रुग्ण वाहिका बोलावून बसमधील जखमींना बाहेर काढून १५ जणांना दोन्ही रुग्णवाहिकेतून नांदेडला उपचारासाठी पाठविले. उर्वरीत कामगार किरकोळ जखमी आहेत. या अपघातातील जखमींना वेळेत उपचार मिळावेत यासाठी पोलिसांनी तातडीने धावपळ करून जखमींना उपचारासाठी पाठविल्यामुळे त्यांची नांवे समजू शकली नाही.
आखाडा बाळापूर पोलिसांची माणुसकी
सध्या कडक्याची थंडी असल्याने आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, जमादार शेख बाबर आदींसद पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या कामगारांची नाश्ता, चहा पाण्याची व्यवस्था करीत खाकीवर्दीतील माणुसकी दाखवून दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.