आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावर्धा येथे शुक्रवारपासून ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ झाला. आजवरचा इतिहास पाहता संमेलनाच्या उद्घाटकांचे खुमासदार भाषण एेकण्यासाठी रसिकांप्रमाणे साहित्यिकांमध्येही मोठी उत्सुकता असते. मात्र यंदाचे उद्घाटक शिंदे यांनी अतिशय त्रोटक शब्द‘समृद्धी’चा वापर करत व एका वाक्याची दुसऱ्या वाक्याला लिंक न लागणारे ‘संदर्भहीन’ भाषण केल्याने सर्वांची निराशा झाली. आपल्या भाषणात शिंदेंनी १५ ते २० वेळा ‘खरं म्हणजे’, ४ ते ५ वेळा ‘संमेलनाला शुभेच्छा’ अन् ५ ते ७ वेळा ‘तुम्ही सूचना करा आम्ही काम करू’ अशी तेच ते रटाळ शब्दप्रयोग केल्याने उपस्थित रसिकही कंटाळले. नागपूर- मुंबई या समृद्धी महामार्गाचाही वारंवार प्रचारकी उल्लेखही त्यांनी केला. “संमेलनातील गर्दी, ही संस्कृती परंपरा आपण जपली पाहिजे’ असे थोडेसे साहित्यिक वळण घेत त्यांनी मायमराठीला काहीसे ‘उपकृत’ करण्याचाही प्रयत्न केला. आचार्य विनोबा भावे सभामंडपात मुख्य कार्यक्रम झाला. या वेळी संमेलनाध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, मावळते संमेलनाध्यक्ष भारत सासणे, स्वागताध्यक्ष दत्ता मेघे, साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील आदी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, ‘संमेलनात सगळ्यांचे स्वागत करताे, मला उद्घाटन करायला मिळेल असे वाटले नव्हते, उपस्थित सगळ्यांना शुभेच्छा. मराठी भाषेसाठी पंढरीची वारी करावी, तसे या संमेलनाला आलेल्या सर्वांचे मी ‘स्वागत’ करताे, ‘शुभेच्छा’ देताे. आपली मराठी भाषा, संमेलन आणि ग्रंथप्रदर्शन हे सदृढ सांस्कृतिक लाेकशाहीचं विराट रूप आहे. मुंबईतील विश्व संमेलनाचे काैतुक झाले. ‘खरं म्हणजे’ संस्कृती, परंपरा जपण्याच्या पाेषणाला त्यामुळे हातभार लागताे. संमेलनात राजकारण्यांचे काम नाही. आज साहित्यिकांचं राज्य आहे. ‘खरं म्हणजे’ साहित्यिक समाजसेवाच करतात. ‘खरं म्हणजे’ राजकारणी व साहित्यिकांची सामाजिक तळमळ असते. लेखक-कवी सांस्कृतिक आरसा आहे, त्यातून मातीचा गंध येताे. ज्यांना ज्ञानपीठ मिळाला ताेच वारसा आपण पुढे नेत आहाेत. ती संस्कृती, परंपरा जपली पाहिजे. आपण ‘समृद्धी’ (महामार्ग) बांधला. ११ जिल्हे जाेडले. साहित्यिकांनी त्यावरून जाऊन गावाचे प्रश्न मांडावे. साहित्य अविभाज्य भाग आहे, त्याच्या ‘समृद्धी’साठी सरकार वचनबद्ध आहे. ‘खरं म्हणजे’ तुमच्या काही सूचना, मार्गदर्शन आले तर ते द्या, प्रकल्प खऱ्या अर्थाने मार्गी लागतील.
यापुढे सर्वच अ.भा. मराठी संमेलनाध्यक्षांना राज्य अतिथींचा दर्जा देण्याची घोषणा
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना आता यापुढे राज्य अतिथींचा (स्टेट गेस्ट) दर्जा देण्यात येईल.
वर्धा येथील सेवाग्राम मार्गावरील चरखा भवन येथे महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या मोठ्या प्रतिमा आहेत. तिथे ‘लाइट, साउंड अँड लेझर शो’ सुरू केला जाईल.
मराठीची सेवा करणाऱ्या महाराष्ट्राबाहेरील संस्थांना संमेलनासाठी तसेच वारकरी संमेलनासाठी प्रत्येकी २५ लाख निधी. संमेलनाचे अनुदान ५० लाखांवरून वाढवून २ कोटी करण्यात आले. विश्व साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठीचे अनुदान १० कोटींवरून वाढवून १५ कोटी केले.
स्वतंत्र विदर्भासाठी गोंधळ घालणारे कार्यकर्ते ताब्यात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना अचानक काही कार्यकर्त्यांनी ‘विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी ठराव मांडावा,’ अशी मागणी करत घोषणाबाजी केली. मात्र स्वतंत्र भारत पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मधुभाऊ हरणे यांच्या नेतृत्वाखालील घोषणा देणाऱ्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. जय विदर्भ पार्टी व विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी संमेलनस्थळी स्वतंत्र विदर्भाची मागणी करत घोषणाबाजी केली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन संमेलन स्थळावरून बाहेर काढले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.