आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअयोध्येतील बाबरी ढाचा पाडण्याच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका करत बाबरी ढाच्या पाडण्यात शिवसेनेचा सहभाग नसल्याचा आरोप केला होता. शिवसेनेच्या वतीनेही त्याला प्रत्युत्तर देण्यात आले. मात्र शिवसेनेच्या प्रतिउत्तरावर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पलटवार केला आहे. बाबरी ढांचा पाडला त्या वेळी शिवसेनेचे नेते कोलकत्ता मध्ये होते. या घटनेचे सविस्तर विवरण शिवसेनेचा नवा मित्र असलेल्या कॉंग्रेसच्या मुखपत्रात प्रसिद्ध झाले असल्याचा दावा देखील त्यांनी केला.
केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेनेवर पलटवार केला आहे या संदर्भात ते म्हणाले की, 'मुख्यमंत्रिपदासाठी हिंदुत्वावर पाणी सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केलेल्या शिवसेनेला अचानक हिंदुत्वाची आठवण येऊ लागली आहे. काल देवेंद्र फडवीस यांनी अयोध्येतील वादग्रस्त ढाचा पाडण्यात शिवसेनेच्या भूमिकेचा पद्धतशीर पंचनामा केल्यानंतर आता शिवसेनेचे बोलघेवडे प्रवक्ते संजय राऊत यांनी तेव्हाच्या घटनाक्रमाबाबत वाऱ्यावरच्या वार्ता कथन करण्यास सुरुवात केली आहे. मात्र प्रत्यक्षात ही घटना घडली तेव्हा शिवसेना नेते तिथे नव्हतेच.'
इतकेच नाही तर उपाध्ये पुढे म्हणाले की, 'अयोध्येतील हॉटेल तेव्हा भरलेली असल्याने त्यांना तिथे जागा मिळेना. म्हणून त्यांना तंबूत राहण्यास सांगितले गेले. मात्र ही बाब समजताच त्यांना मागे परतण्याचे आदेश दिले गेले. त्यामुळे शिवसेनेचे प्रमुख नेते अयोध्येतून माघारी परतले. या घटनेचं सविस्तर विवरण शिवसेनेचा नवा मित्र असलेल्या काँग्रेसच्या मुखपत्रात २५ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रसिद्ध झालेल्या अंकात देण्यात आलं आहे. बाबरी पतनात शिवसेनेचा सहभाग जर तरचा होता. तर प्रत्यक्षात लाखो कारसेवकांनी तो ढाचा पाडला होता. अजून काय सांगणार..।'
बाबरी ढाचा पाडण्यावरून श्रेयवाद
बाबरी ढाचा पाडण्यात आल्यानंतर आता तेथे भव्य राम मंदिर उभे राहत आहे. मात्र, शिवसेना आणि भाजप यांच्यात वादाची लढाई दिसून येत आहे. शिवसेनेच्या वतीने बाबरी ढाचा पाडण्यात शिवसैनिकांचा सहभाग होता असा दावा केला जातोय तर भाजपच्या वतीने हा दावा खोटा ठरवण्यात येत आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आता श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचे दिसून येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.