आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासन व प्रशासकीय पातळीवर कितीही प्रयत्न झाले तरी बालविवाह रोखले जात नसल्याचे स्पष्ट होत आहे. परभणी जिल्ह्यात तर शेतात खुरपणी करताना आई व तिच्या १३ वर्षीय मुलीला उसाच्या फडात नेत २८ वर्षीय तरुणासोबत तिचा बालविवाह लावल्याचा धक्कादायक प्रकार पाथरी तालुक्यातील मंजरथ या गावात घडला. मुलीचे मामा व जवळील काही नातेवाईक आता तक्रार करण्यास समोर आले आहेत. एक हजार लोकसंख्या असलेल्या मंजरथ गावात पाचवीतील मुलीचे कुटुंब राहते. आई, वडील शेतमजूर आहेत. मुलगीही आईसोबत मजुरीला जाते. लग्न लावलेला तरुण किशोर सूळ (२८) हा गावातीलच असून मागील अनेक दिवसांपासून किशोरचे कुटुंबीय मुलीच्या पालकांकडे लग्नासाठी आग्रह धरत होते. मुलगी अल्पवयीन असल्याने आई सातत्याने यासाठी नकार देत होती. पण दबाव टाकून हा विवाह लावून देण्यास भाग पाडल्याचे मुलीच्या मामा गणेश थोरात यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
मुलीच्या आईशी बोलण्याचा प्रयत्न केला असता ती म्हणाली की, नेहमीप्रमाणे मुलीला घेऊन आपण खुरपणीसाठी शेतात गेलो असता सूळ कुटुंबातील काही जणांनी बळजबरी आम्हाला जवळील उसाच्या फडात नेले. तेथे आधीपासून लग्नाची तयारी करून ठेवण्यात आली होती. काही कळण्याचा आतच लग्न लावून देण्यात आले. ५० हजार रुपये देतो, असे म्हणत मुलाला दोन ते तीन एकर शेती असल्याचे त्यांनी सांगितल्याचे मुलीची आई म्हणाली.
तक्रार दाखल करून घेऊ : पोलिस पाटील बाबासाहेब अतकरे म्हणाले की, गावात बालविवाह झाला नाही. इतरत्र जाऊन त्यांनी हा प्रकार केला आहे. नातेवाइकांनी तक्रार दिल्यास ती पोलिसांकडे पाठवली जाईल. सोमवारी अल्पवयीन मुलगी व त्या तरुणाच्या घरी जाऊन माहिती घेतो. सरपंच दशरथ सावंत म्हणाले की, या घटनेची कुठलीही कल्पना नव्हती. याबाबत कुणी काही बोलत नसल्याने व गावात चांगले संबंध असल्याने मला थेट बोलता येत नाही.
पाच ते सहा जण मध्यस्थ : मुलीची आई बालविवाहाला नव्हती तयार
लग्न लावण्यात आलेला तरुण अल्पवयीन मुलीच्या नात्यातीलच आहे. वय कमी असल्याने मुलीचे लग्न करायचे नाही यावर आई ठाम होती. पण गावातील पाच ते सहा जणांनी मध्यस्थी करून हे लग्न जमवले व अल्पावधीत ते उरकूनही टाकले. मुलीचे वडील मद्यपी असल्याने काही जणांनी त्यांना सलग काही दिवस दारू पाजली व लग्नासाठी तयार केल्याचा आरोप मुलीचे काही नातेवाईक करत आहेत. अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्याचे आई व मुलीच्या नातेवाइकांनी मान्य केले. आईच्या म्हणण्यानुसार लग्न १३ दिवस आधी झाले. मुलीचा मामा म्हणताे याला आठ दिवस झाले. सरपंच व पोलिस पाटील मात्र पाच ते सहा दिवसांपूर्वी विवाह झाल्याचे म्हणत आहेत.
मुलीची सुटका व्हायलाच हवी
कुठल्याही नातेवाइकांना भनक लागण्याच्या आधी हा बालविवाह उरकून टाकण्यात आला. या विवाहाला आमचा विरोध आहे. मुलीच्या वडिलांना दारू पाजून व आईला धमकी देत हा प्रकार घडला आहे. याला आमचा कायम विरोध राहील. आता त्या मुलीची सुटका होणे गरजेचे आहे - सुंदर काळे, मुलीचे नातेवाईक.
सुरुवातीपासूनच माझा विरोध
या बालविवाहाला आधीपासूनच माझा विरोध होता. मी बाहेरगावी असताना दुपारीच बालविवाह करण्यात आला. आताही त्या तरुणाच्या तावडीतून मुलीला सोडवून आणण्याची माझी तयारी आहे. तशी तक्रार मी करणार आहे. - गणेश थोरात, मुलीचे मामा.
एक्सपर्ट व्ह्यू : याला ग्रामसेवकच जबाबदार
कमी वयात मुलींचे लग्न लावून देणे आणि बालकांच्या तस्करीबाबत परभणी हे भारताच छुपे केंद्र आहे. असे प्रकार जर हाेत असतील तर २००६ च्या बालविवाह प्रतिबंध कायद्यांतर्गत ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांना याची माहिती असायला हवी. बालविवाह झाल्यानंतरही तक्रार नाेंदवली गेली नसेल तर यात ग्रामसेवकही जबाबदार आहे. -रेणुका कड, अनैतिक मानवी व्यापार, वाहतूक समिती सदस्य.
दिव्य मराठी Explainer
का वाढले बालविवाह?
महामारीमध्ये बेराेजगारीचे प्रमाण वाढते. कुटुंबाचा भार साेसणे अवघड हाेते आणि गरीब कुटुंब हा निर्णय घेतात. मुलींचे शिक्षण, संगोपन हे कुटुंबासाठी नेहमी दुय्यम असते. त्यामुळेही बालविवाह केले जातात. मुलगी वयात आल्यावर तिच्या सुरक्षेचा प्रश्न भेडसावताे. त्यामुळे पालक लग्न लावून देतात.
कुठले मुद्दे कारणीभूत?
ग्रामीण भागात गरीब कुटुंबातील मुलांपर्यंत शिक्षण पाेहाेचले नाही. शिवाय पालकांच्या अशिक्षितपणामुळे अल्पवयीन मुलींचे लग्न होतात.
अशी करता येईल तक्रार
लग्न झाल्यामुळे पोलिस तक्रार घेण्यास टाळाटाळ करू शकतात. अशा स्थितीत नातेवाइक परभणीतील निरीक्षण किंवा बालगृहात बाल कल्याण समितीकडे सोमवार, बुधवार, शुक्रवारी तक्रार अर्ज देऊ शकतात. चाइल्ड लाइनला फोनही करता येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.