आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वातावरणात बदल:थंडी-पावसाचा अवकाळी खेळ; पारा चढला, गारठा ओसरला अन् नांदेडमध्ये पावसाची हजेरी

परभणी/नांदेड14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • परभणीत एकाच दिवसात 5 अंशांनी वाढले तापमान, पुढील काळात वाढणार थंडी

मराठवाड्यामध्ये सध्या थंडी आणि पावसाचे अवकाळी रूप पाहायला मिळत आहे. मागील चार दिवसांत वातावरणात कमालीचा बदल पाहायला मिळाला. दिवसभर अनेक भागांत ढगाळ वातावरण पाहायला मिळत असून गेल्या चार दिवसांत किमान तापमानाचा १० अंश सेल्सियसपर्यंत घसरलेला पारा रविवारी २३ अंशांपर्यंत पोहोचला होता. नांदेडमध्ये तर रविवारी नांदेड शहर-जिल्ह्यातील काही भागात पहाटेच्या सुमारास हलक्या सरी कोसळल्या. दिवसभर अधुनमधून ढगाळ वातावरण व थंड हवा सुटली होती.

मराठवाड्यातील अनेक भागांत चार ते पाच दिवसांपूर्वी तापमानाचा पारा १० ते १५ अंश सेल्सियसवर गेला होता. ११ नोव्हेंबरला परभणीचा किमान तापमानाचा पारा १०.८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेल्याची नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान विभागात झाली होती. परंतु, त्यानंतर ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ होत आहे. परिणामी, एकाच दिवसात म्हणजेच १२ नोव्हेंबर रोजी किमान तापमान १५.९ अंश सेल्सियसवर पोहोचले. तर १३ रोजी २१ अंश सेल्सियस आणि रविवारी २३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद विद्यापीठातील हवामान विभागात घेण्यात आली आहे. सर्वत्र पहाटे आणि रात्रीच्या सुमारास थंड वारे वाहत असून दिवसभर मात्र ढगाळ वातावरणाचा सामना परभणीकरांना करावा लागत आहे.

पावसामुळे तुरीवर होणार परिणाम
नांदेड | प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, रविवारी पहाटे नांदेड शहरासह बिलोली, मुखेड, कंधार, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, मुदखेड, उमरी, अर्धापूर, नायगाव आदी ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाने हजेरी लावली. ०.८ मिली मिटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे तुरीच्या पिकावर परिणाम होणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.जिल्ह्यात सध्या रब्बीच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे. यंदा सरासरीच्या १३४ टक्के पाऊस झाला. मागील वर्षी जिल्ह्यात तीन लाखांपेक्षा अधिक हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली होती. यंदा यात वाढ होऊन रब्बी हंगामात तीन लाख ४८ हजार ८१५ हेक्टरवर पेरणीचा अंदाज आहे.

या पावसाचा रब्बीतील गहू, हरभरा, करडई आदी पिकांवर फारसा परिणाम होत नाही. कारण पाऊस जास्त प्रमाणात नाही. खरिपातील तुरीवर शंभर टक्के परिणाम होतो. तूर सध्या फुलोरा ते शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. तूर पिकासाठी या अतिशय संवेदनशील अवस्था आहेत. आभाळामुळे अळीचा प्रादुर्भाव होतो. शिवाय फुलगळती होण्याची शक्यता, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सेवानिवृत्त शास्त्रज्ञ डॉ. यू. एन. अळसे यांनी वर्तवली.

पुढील चार दिवस राहणार पाऊस
पुढे तीन ते चार दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. १५ नोव्हेंबर रोजी बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यात, १६ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात, १७ रोजी लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा वेगही ताशी ३० ते ४० किमी राहील.

ढगाळ वातावरण का निर्माण होत आहे ?
नोव्हेंबर महिन्यात एखाद्या वेळी ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते. सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तसेच ईशान्येकडील मान्सून सक्रिय असल्याने मराठवाड्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. यामुळे तापमानात वाढ होत असल्याचे चित्र आहे.

पुढील काळात थंडी वाढेल का?
पुढील तीन ते चार दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे किमान तापमानात जास्त घट होणार नाही. मात्र जसजसे ढगाळ वातावरण स्वच्छ होईल, उत्तरेकडील वाऱ्यांचा जोर वाढेल, त्यानंतर थंडीचा जोर हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. - डॉ. के. के. डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मोसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.

बातम्या आणखी आहेत...