आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे अस्तित्व टिकवण्यासाठी नाही तर ते निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यामुळे अशा खेळाडूंकडे मी लक्ष देत नाही अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. कधी मराठीचा मुद्दा, कधी हिंदुत्वाचा मुद्दा तर कधी भोंगे असं नवीन नवीन काहीतरी करुन पाहण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा म्हणजे गाजराची पुंगी 'वाजली तर वाजली' अशी टीका देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली. लोकसत्ताच्या वतीने मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन मुलाखत घेण्यात आली, या वेळी ठाकरे बोलत होते.
राज ठाकरे यांच्या पक्षाला झेंडे बदलण्याची गरज पडली. अशी झेंडे बदलण्याची गरज का पडली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मात्र आतापर्यंत शिवसेनेने एकदाही झेंडा बदलला नाही आणि बदलणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मनसेला मात्र अस्तित्व दाखवण्यासाठी असे करावे लागले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
चांगल्या कामाचे कौतुक करण्यासाठी मोठेपणा लागतो
उत्तर प्रदेश मधील धार्मिक ठिकाणी असलेल्या भोंगे उतरवण्यात आले. महाराष्ट्र मध्ये असा निर्णय होईल का? या प्रश्नाला देखील मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तर दिले. उत्तर प्रदेश मध्ये कोरोना काळात वाईट परिस्थिती पाहता त्या पेक्षा महाराष्ट्रात चांगले काम केले आहे. मात्र, महाराष्ट्राच्या चांगल्या कामाचे कौतुक करण्याचे मोठेपण काही लोकांकडे नाही अशी टीका त्यांनी केली.
2017 मधील राजकारणाची माहिती नव्हती
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची 2017 मध्ये युती होणार हाती, याबाबत मला काहीही माहिती नव्हती. आम्ही आमचा युती धर्म पाळत होतो, असा दावा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला. तीन पक्षाची युती होणार हे त्या वेळी शिवसेनेला सांगितलेले नव्हते. त्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या युतीचा मुद्दाच आला नव्हता, असेही त्यांनी सांगितले.
सर्व धार्मिक स्थळांना मर्यादा पाळावी लागतील
महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे सर्वच धार्मिक स्थळावरील भोंग्यांना मर्यादा पाळाव्या लागतील, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत दिलेल्या आवाहनाचा त्यांनी समाचार घेतला. या संदर्भात न्यायालयाने निकाल दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कायद्याप्रामणे सर्वांनाच चालावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.
पेट्रोल फुकट वाटल्याने कोरोना संपेल का?
ज्यावेळी सर्व संकटात असतात अशा वेळी उणीदुणी काढण्याचा गरज नसते, अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत विषय नसताना आकस्मित पणे मोदींनी पेट्रोल-डिझेलच्या प्रश्नावर महाराष्ट्रावर बोट ठेवले. पेट्रोल फुकट वाटल्याने कोरोना संपेल का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
विरोधी पक्षावर टीकास्त्र
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या दोघांतील संबंधाबाबत मुख्यमंत्र्यांनी भाष्य करत विरोधी पक्षातील नेत्यांचा समाचार घेतला. शरद पवार कायम घरी येत होते मात्र, सभांमध्ये दोघे एकमेकांवर टीका करत होते. मात्र बाळासाहेबांनी कधीच पवारांचा एकरी उल्लेख केला नाही, असे देखील त्यांनी सांगितले. विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये मतभिन्नता मी समजू शकतो मात्र त्यांच्यातील सूडबुद्धी मला समजत नाही, ती वाढत चालली असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.