आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी:कोरोनामुळे शिक्षणाच्या चिंतेने परभणीत महाविद्यालयीन तरुणाची आत्महत्या

परभणीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • धारूरला रागाच्या भरात शाळकरी मुलीची आत्महत्या

कोरोना आणि सततचे लॉकडाऊन यामुळे भविष्यात शिक्षणाचे काय होईल या चिंतेने परभणी जिल्ह्यातील एका महाविद्यालयीन तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर बीड जिल्ह्यात धारूर तालुक्यात सातवीत शिकणाऱ्या १३ वर्षांच्या मुलीने आई-वडील घरातील कामे सांगतात म्हणून रागाच्या भरात आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.

शुभम गंगाधर उगले (२०, रा.धर्मापुरी) हा परभणी येथील एका महाविद्यालयात बी.ए. प्रथम वर्षात शिकत होता. सतत लॉकडाऊन होत असल्याने माझ्या शिक्षणाचे पुढे काय होणार या विवंचनेत शुभम उगले याने राहत्या घरी फॅनला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ आहेत. तो नेहमी एकटा राहत होता आणि सततच्या लॉकडाऊनमुळे त्याचा ताण वाढल्याने त्याने हा निर्णय घेतल्याचे गावातील एका तरुणाने सांगितले.

कामे सांगतात म्हणून राग : दुसऱ्या घटनेत धारूर तालुक्यातील अंजनडोह येथे सोमवारी सायंकाळी सहा वाजता रेणुका शंकर रेपे (१३) हिने गळफास घेतल्याचे समोर आले. ६ दिवसांपूर्वीच रेणुकाचे आई-वडील ऊसतोडणीचे काम करून गावी परतले होते. रेणुका ही तिच्या लहान भावासोबत आजीकडे राहत होती. सोमवारी आई-वडील शेतात गेले होते तर आजी धारूर येथे आली होती. त्यानंतर सायंकाळी तिने गळफास घेतला.

घरातील मोठ्यांशी मन मोकळे करा
कोरोनामुळे अनेकांना नैराश्याचा सामना करावा लागत आहे. विशेषत: तरुणांना अशी समस्या भेडसावत असल्यास घरातील मोठ्या व्यक्तींशी मनमोकळेपणाने बोलावे, असा सल्ला प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ.संदीप शिसोदे यांनी दिला आहे. कोराेनावर लस आली आहे. त्यामुळे लवकरच परिस्थिती नियंत्रणात येऊन सर्वकाही सुरळीत होणार आहे. भविष्याची चिंता करण्यापेक्षा सध्या आपल्यासाठी अभ्यास करणे आवश्यक आहे, ही बाब मनावर कायम नोंदवत राहा. मनाला भरकटवणारे विचार टाळा. लिखाणाचा जास्तीत जास्त सराव केल्यास तणाव कमी होतो. भीती वाटत असेल तर घरातील लोकांशी किंवा परिचित, विश्वासातील मोठ्या व्यक्तींशी मोकळेपणाने बोला, असे डॉ.शिसोदे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...