आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपविरोधी राष्ट्रीय आघाडीच्या हालचाली:देशव्यापी आघाडीचा आत्मा काँग्रेस असेल, संजय राऊत यांचे वक्तव्य

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काँग्रेसच्या तीव्र नाराजीमुळे राऊत यांनी घेतला यू टर्न

राज्यातील महाविकास आघाडी देशातील एक आदर्श राजकीय आघाडी आहे. राष्ट्रीय स्तरावरही अशा आघाडीची गरज आहे. या विषयावर शरद पवारांशी चर्चा झाली असून त्यासाठी लवकरच हालचाली सुरू होतील, असे शिवसेनेचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी रविवारी सांगितले. देशात काँग्रेसशिवाय इतर कोणतीही आघाडी निर्माण होणार नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल पक्षाच्या ममता बॅनर्जी यांनी जी मुसंडी मारली ती जबरदस्त आहे. पण भविष्यात देशात अशी आघाडी निर्माण व्हावी ही सगळ्यांचीच इच्छा आहे. या आघाडीचा आत्मा हा काँग्रेस पक्ष असेल, असे सांगून कोरोनाच्या बाबतीत महाराष्ट्रातील स्थिती आता सर्वात चांगली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी चांगले काम करत आहे. इतर राज्यांत ही स्थिती दिसत नाही. इतर राज्यांत स्मशानभूमीसमोर प्रेतांच्या रांगा लागल्याचे दुर्दैवी चित्र दिसते आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर बोलताना राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत. आरोप करणे त्यांचे काम आहे. राज्य सरकारचे कार्य चांगले नसल्याचा त्यांनी आरोप केला होता. पण त्यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल उत्तर दिले आहे. कोरोना काळात महाराष्ट्राने चांगले काम केल्याचे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांना फोनवर म्हणाले आहेत.

काँग्रेसच्या तीव्र नाराजीमुळे राऊत यांनी घेतला यू टर्न
संयुक्त पुराेगामी आघाडीचे नेतृत्व शरद पवार यांनी करावे, असे संजय राऊत यांनी अनेकवेळा सुचवले होते. त्यावर काँग्रेसने आक्षेप घेत शिवसेना संयुक्त पुराेगामी आघाडीचा घटक पक्ष नसल्याने राऊत यांनी त्यावर बोलू नये, असे सुनावले होते. राऊत यांनी यू टर्न घेत भाजपविरोधी आघाडीचा काँग्रेस पक्ष आत्मा असेल, असे म्हटले आहे. पवार यांच्या इशाऱ्यावरूनच राऊत यांनी देशव्यापी आघाडीचे पिल्लू सोडल्याचे काँग्रेसच्या गोटात बोलले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...