आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आंदोलनाला पाठिंबा:शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे गुरुवारी राज्यव्यापी आंदोलन- बाळासाहेब थोरात

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेतकऱ्यांच्या मागण्यांप्रमाणे कृषी कायद्यात बदल करावा

केंद्र सरकारने लादलेल्या जुलमी कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून या कायद्याविरोधात शेतकरी एकवटला आहे. हे जाचक कायदे रद्द करावेत या मागणीसाठी शेतकरी दिल्लीत पोहचला असून मागण्या मान्य होईपर्यंत ते मागे हटणार नाहीत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी काँग्रेस पक्ष उद्या गुरुवारी ३ डिसेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलन करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

यासंदर्भात थोरात म्हणाले की, भाजपा सरकारच्या या शेतकरी विरोधी कायद्यांना काँग्रेसने सुरुवातीपासूनच विरोध दर्शवलेला आहे. हे काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मागील दोन महिने सातत्याने विविध आंदोलने केली आपला विरोध व्यक्त केलेला आहे.किसान व्हर्च्युअल महा मेळावा, किसान हक्क दिवस, जिल्हा-जिल्ह्यात धरणे आंदोलन, राजभवनवर पदयात्रा काढून राज्यपालांना निवेदन दिले, ट्रॅक्टर रॅली काढल्या, काळ्या कायद्याविरोधात सह्यांची मोहिम राबवण्यात आली. यात राज्यभरातील ६० लाखांपेक्षा जास्त शेतकरी, शेतमजूर, कामगारांनी सहभाग नोंदवला होता. उद्याच्या आंदोलनातही मोठ्या संख्येने लोक सहभागी होऊन आपला विरोध व्यक्त करतील. कृषी कायद्याला विरोध करत शेतकरी आता देशाची राजधानी दिल्लीत एकवटला आहे.

सात दिवसांपासून ते दिल्लीत ठाण मांडून आहेत. त्यांच्या मनात या कायद्याविषयी काही शंका आहेत त्यांच्याशी चर्चा करुन केंद्र सरकारने त्यांना आश्वस्त केले पाहिजे. भाजपा सरकार जाहीरपणे हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत असे सांगत आहे परंतु शेतकऱ्यांचे त्यातून समाधान होत नाही. भाजपच्या कथनी आणि करनीमध्ये अंतर असल्याने शेतकरी त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. शेतकरी कृषी कायद्यात बदल करण्याची मागणी करत आहेत त्याप्रमाणे केंद्र सरकारने कायद्यात बदल करावा. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असेही थोरात म्हणाले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser