आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्स्पोज:कोरोनाबाधित बालकांची स्वतंत्र आकडेवारीच नाही; प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे निकष; सामायिक माहितीचा प्रशासकीय गोंधळ

2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • कुठे 15 वर्षांपर्यंतची नोंद, कुठे 0 ते 10 हा वयाेगट, तर कुठे माहितीच नाही

लहान मुलांमधील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र टास्क फोर्स, वेगळे वॉर्ड‌्स याची युद्धपातळीवर तयारी सुरू असताना नेमक्या किती बालकांना कोरोनाची लागण झाली आहे याची सामायिक माहिती कुठेही उपलब्ध नाही. “दिव्य मराठी’च्या राज्यभरातील प्रतिनिधींनी याबाबतची माहिती संकलित केली असता बहुतांश ठिकाणी बालकांच्या संक्रमणाच्या स्वतंत्र नोंदी ठेवण्यात आल्या नसल्याचे पुढे आले.

काही महापालिकांनी शून्य ते १० आणि १० ते २० अशा वयोगटांतील रुग्णांच्या स्वतंत्र नोंदी ठेवल्या आहेत, तर काही जिल्ह्यांमध्ये २० वर्षांखालील रुग्ण अशा नोंदी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे १५ वर्षांखालील नेमकी किती बालके आतापर्यंत राज्यात संसर्गित झाली आणि आजच्या सक्रिय रुग्णांमध्ये बालकांची संख्या किती याची एकत्रित माहिती कुठेही उपलब्ध नसल्याचे पुढे आले आहे.

टास्क फोर्सच अनभिज्ञ
अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी बालकांसाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना केली. कोरोनात अनाथ झालेल्या बालकांपासून कोरोना संसर्गित बालकांसाठी हा टास्क फोर्स काम करणार असल्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, हा टास्क फोर्स पॉझिटिव्ह बालकांच्या संख्येबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून अाले.

नेमका ‘वयोगट’ कोणता?
काही जिल्ह्यांमध्ये १८ वर्षांखालील मुलांची नोंद ठेवली जात आहे, तर काही महानगरपालिका १५ वर्षांखालील. काही जिल्ह्यांमध्ये ० ते १० अाणि ११ ते २० असे दाेन वयाेगट केले अाहेत. जेथे स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहेत तेथील अाकडेवारी मिळते, मात्र त्यात एकवाक्यता नाही.

टास्क फाेर्सला सूचना
व्याख्येप्रमाणे “बालके’ म्हणजे शून्य तेे १४ हा वयोगट धरला जात होता, परंतु कोविड रुग्णांच्या वयोगटनिहाय नोंदणीत वेगवेगळे वयोगट दिसत आहेत. याबाबत टास्क फोर्सला सूचना देऊ. मुलांबाबतच्या संसर्गाचे नियोजन सुरू असल्याने या नोंदी व स्वतंत्र आकडेवारीचाही विचार करावा लागेल. - डॉ. सुभाष साळुंखे, सल्लागार, कोविड टास्क फोर्स

घाबरू नका
तिसऱ्या लाटेत मुलांमधील संसर्गाचे ठाेस संकेत नाहीत. दुसऱ्या लाटेत मुलांमधील संक्रमण दिसत असले तरी त्याचे प्रमाण सौम्य आहे. तिसऱ्या लाटेतील मुलांबाबतच्या धाेक्याची चर्चा सुरू अाहे, पण मला ताे धाेका वाटत नाही. मुलांनी व पालकांनी घाबरू नये. - डॉ. रणदीप गुलेरिया, एम्स, दिल्ली

बीड जिल्ह्यात ८ हजार!
येथे शून्य ते १८ वयोगटांतील तब्बल ७ हजार ९८५ रुग्ण दुसऱ्या लाटेत आढळून आले आहेत. जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या हे प्रमाण १० टक्के असल्याने बीडमधील बालकांमधील हा संसर्ग धोक्याची घंटा ठरत आहे.

कुठे १५ वर्षांपर्यंतची नोंद, कुठे ० ते १० हा वयाेगट, तर कुठे माहितीच नाही

साेलापूर जिल्हा

 • एकूण पॉझिटिव्ह बालके : १०,००५
 • सध्याचे सक्रिय रुग्ण : ६७
 • बालकांची स्वतंत्र नोंद : अाहे

जळगाव जिल्हा

 • एकूण पॉझिटिव्ह बालके : ८,५६६
 • आजचे सक्रिय रुग्ण : ११
 • बालकांची नोंद : १५ वर्षांपर्यंत

बीड

 • एकूण पॉझिटिव्ह बालके : ७,९८५
 • आजचे सक्रिय रुग्ण : माहिती नाही
 • स्वतंत्र नोंद : नाही

नाशिक

 • एकूण पॉझिटिव्ह बालके : ७,७८७
 • सक्रिय रुग्ण : संकलन सुरू
 • बालकांची नोंद : १० वर्षांपर्यंत

नांदेड

 • एकूण पॉझिटिव्ह बालके : ७,६७८
 • सध्याचे सक्रिय रुग्ण : ११६
 • बालकांची नोंद : १२ वर्षांपर्यंत

हिंगोली

 • एकूण पॉझिटिव्ह बालके : १५०
 • सध्याचे सक्रिय रुग्ण : २०
 • बालक रुग्णांची स्वतंत्र नोंद : नाही

अमरावती

 • एकूण पॉझिटिव्ह बालके : २,२३१
 • सध्याचे सक्रिय रुग्ण : ८३
 • बालकांची स्वतंत्र नोंद : आहे

परभणी

 • एकूण पॉझिटिव्ह बालके : ३,०००
 • सध्याचे सक्रिय रुग्ण : ५४
 • बालक रुग्णांची स्वतंत्र नोंद : नाही

अकोला जिल्हा

 • एकूण पॉझिटिव्ह बालके : १,८३०
 • सध्याचे सक्रिय रुग्ण : २२०
 • स्वतंत्र नोंंदी : नाही

धुळे महापालिका

 • एकूण पॉझिटिव्ह बालके : ७४
 • सध्याचे सक्रिय रुग्ण : ०१
 • बालकांची स्वतंत्र नोंद : नाही
बातम्या आणखी आहेत...