आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद:फळ व भाजीपाला उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान; सरकारने भरपाई द्यावी, आमदार कैलास पाटील यांची मागणी

उस्मानाबाद2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • 'शेतकरी जगला तरच पुढच्या संकटावर मात करता येईल'

दुष्काळाने आधीच जर्जर झालेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काेरोनाच्या पार्श्वभूमिवर नव्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. जिल्ह्यातील भाजीपाला,फळ आणि फुल उत्पादन लॉकडाऊनच्या कालावधीत उकिरड्यावर फेकून द्यावे लागले. परिणामी शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला असून, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. शेतकरी जगला तर पुढच्या संकटावर मात करणे शक्य आहे, असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासकीय यंत्रणेला द्याव्यात, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे. आमदार पाटील यांनी पत्रात म्हटले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यात पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी होते.त्यामुळे कायम अवर्षणस्थिती किंवा दुष्काळाची छाया असते.तरीही बहुतांश शेतकरी कमी पाण्याचे योग्य नियोजन करून फळ, भाजीपाला, फुलशेती करून आधुनिक शेतीची कास धरण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, कधी दुष्काळ तर कधी शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी हतबल होतात. अशा प्रयत्नातून नाउमेद झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी नैराश्य आणि कर्जबाजारीपणातून आपली जीवनयात्रा संपविली आहे. परिणामी शेतकऱ्यांची अनेक कुटंुबे रस्त्यावर आली असून, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्याचे कोरोनाचे संकट शेतकऱ्यांसाठी नवीन समस्या आहे. जिल्ह्यात पिकलेला भाजीपाला, फुले तसेच द्राक्षे,मोसंबी, आंबे, पपई, पेरू आदी फळांना बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतमालाचे जागीच नुकसान झाले. काही शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांमार्फत बाजारपेठेत माल पाठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, व्यापाऱ्यांनी अत्यल्प दरात माल खरेदी केल्याने उत्पादन खर्चही शेतकऱ्यांच्या पदरात पडला नाही.

जिल्ह्यात जरबेरा फुलांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. विविध प्रकारची आकर्षक फुले जिल्ह्यातील पॉलीहाऊसमध्ये उत्पादित होतात. उन्हाळ्यात लग्न समारंभ मोठ्या प्रमाणावर असल्याने या फुलांना मोठी मागणी असते. हैद्राबाद, मंुबई, पुणे, दिल्लीपर्यंत फुले विक्रीसाठी जात असतात. ऐन हंगामात कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने फुलांना बाजारपेठ मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाल्यासोबतच जरबेरा फुले उकिरड्यावर फेकून दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने सामाजिक कार्यक्रमावर बंदी आहे. यामुळे फुले,फळपिके व भाजीपाल्याला मागणी नसल्याने उत्पादक शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत आहेत. यामुळे या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.आधीच दरडोई उत्पन्न कमी असल्याने व दुष्काळाला कायम तोंड देणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने आधार देण्याची गरज आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना देऊन लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना द्याव्यात. तसेच नुकसान भरपाई देण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी पत्राद्वारे केली.

शेतकऱ्यांना मदतीची गरज

दुष्काळ, शेतमालाला कमी दर,यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आधीच अडचणीत आहेत. कोरोनामुळे हाताशी आलेला शेतमाल फेकून दिला. यामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा धीर खचू नये, यासाठी त्यांना शासनाकडून मदतीची गरज आहे.-कैलास पाटील, आमदार, उस्मानाबाद.

बातम्या आणखी आहेत...