आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांढऱ्या सोन्याचे भाव घसरले:कापसाच्या भावात सतत घसरण होत असल्याने शेतकऱ्यांची वाढली चिंता, 'पांढरे सोने' भाव वाढण्याच्या आशेने शेतकऱ्यांनी घरातच साठवून ठेवला कापूस

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑक्टोबर महिन्यात नऊ हजार रुपयांपर्यंत प्रति क्विंटल भाव गाठलेल्या कापसाच्या भावात सध्या मागील पंधरवाड्यापासून सतत घसरण होत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदील झाले आहेत. शेतकऱ्यांनी आणखी भाव वाढेल म्हणून कापुस घरातच साठवून ठेवला आहे. परंतु मंगळवारी पिंपळगाव रेणुकाई येथील बाजारपेठेत खासगी व्यापाऱ्याकडून ७ हजार ७०० रूपये प्रति क्विंटल प्रमाणे कापसाची खरेदी करण्यात आली.

अगोदरच यंदा भोकरदन तालुक्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे कापसाचे पीक हातचे गेले आहे. त्यात आता आणखी दिवसेंदिवस कमी होत असलेले कापसाचे भाव हे नक्कीच शेतकऱ्यांची चिंता वाढविणारे आहे.दरम्यान कापसाच्या भावात आठ दिवसात मोठया प्रमाणात घसरण झाली आहे.

भोकरदन तालुक्यातील शेतकरी दरवर्षी नगदी पिक म्हणून कापसाचे उत्पादन घेत असतो. यंदा देखील खरिपात शेतकऱ्यांनी जवळजवळ ४३ हजार हेक्टरवर कपाशी पिकाची विक्रमी लागवड केली होती. परंतु ऐन कपाशीला कैऱ्या लागण्याच्या काळातच सततधार पावसाने सुरूवात केल्याने कपाशीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे.

शिवाय अनेक शेतकऱ्यांनी कपाशीच्या शेतात तुंबलेले पाणी मोटारीद्वारे बाहेर काढुन कपाशी पिक जगविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत कपाशीचे पिक हातात आणले. परंतु त्यातही कापुस वेचायलाही मजुर सापडत नसल्याने शेतकऱ्यांनी अतिरिक्त भाडे देत विदर्भातील मजुर आयात करीत पाच ते सहा रुपये किलो प्रमाणे मजुरी देत कापुस घरात आणला आहे. अनेक ठिकाणी तर एका वेचणीत कपाशीची उलगंवाडी झाली आहे.

ज्या ठिकाणी पंचवीस क्विंटल कापुस व्हायचा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दहा क्विंटलवरच समाधान मानावे लागले आहे. दिवाळीच्या अगोदर खासगी व्यापाऱ्यांकडून कापुस खरेदीला सुरूवात करण्यात आली होती. सुरूवातीला पाच हजार रुपये प्रति क्विंटल खरेदी होणाऱ्या कापसाचे भाव नऊ हजार रुपयापर्यंत जाऊन पोहचले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना कापसाचे आणखी भाव वाढतील म्हणून कापुस घरातच साठवून ठेवला आहे.

परंतु सध्या दिवसेंदिवस कापसाच्या भावात घसरण होत चालली असल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सुर उमटत आहे. आठ दिवसात कापसाच्या दरात दहा रुपयाची घसरण झाली आहे. दिवसेंदिवस कापसाचे बाजार शंभर-दोनशे रुपयाने तुटत चालले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाले आहेत. शिवाय घरात माल असल्यावर भाव वाढत नाही मात्र घरातुन विकल्यावर शेती मालाचे भाव वाढतात याचा प्रत्यय शेतकऱ्यांना दरवर्षी येऊ लागला आहे.

शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेले हे पांढरे सोने घरी आणण्याकरिता शेतकऱ्यांना लागवडीपासुन ते कापूस घरी आणेपर्यंत मोठा खटाटोप करावा लागला आहे. मजुरांची विणवणी करुन कापुस वेचावा लागला आहे. यातच अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनात देखील घट झाली आहे. तरी देखील शेतकऱ्यांनी जिवाचे रान करीत जमेल त्या पद्धतीने कपाशीच्या शेतातील चिखल तुडवीत कापुस घरात आणला आहे. यातच आता कापसाच्या दरात होत असलेली घसरण पाहुन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दरम्यान, सरकीचे भाव उतरले आहे तसेच गठाणचे देखील बाजार कमी झाले आहे. बाजारात कापसाची आवक वाढली असल्याने कापसाच्या भावात घसरण होत चालली आहे. आणखी भाव कमी होण्याची शक्यता वाटत असल्याचे पिंपळगाव रेणुकाई येथील कापुस व्यापारी, भिमराव नरवाडे यांनी सांगितले.

पंधरा दिवसांत कापसाच्या भावात घसरण : कापसाला सुरूवातीला खाजगी व्यापाऱ्याकडून प्रति क्विंटल पाच हजार रुपयांचा भाव देण्यात आला तो भाव नंतर ५ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल झाला, पुन्हा आठ दिवसांत ते ७ हजार ते ८ हजार ६०० रुपये प्रतिक्विटंल भाव झाला.पंरतु सध्या आठ दिवसांत कापसाच्या भावात दहा रुपयांची घसरण झाली आहे. भावात आणखी घसरण होण्याची शक्यता कापूस व्यापारी व्यक्त करीत असल्याने शेतकरी नाईलाजाने कापूस भाववाढीच्या अपेक्षेने घरात साठवून ठेवलेला कापूस विक्रीसाठी काढत आहेत.

दहा हजारपेक्षा अधिक दर
बियाणे आणि खतांच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. अतिवृष्टीमुळे उत्पादनात बसलेला फटका मजुरीवर झालेला खर्च या पार्श्वभूमीवर कापसाला प्रतिक्विंटल १० हजार रुपयापेक्षा अधिक भाव असणे गरजेचे आहे. माञ सध्या कापूस व्यापाऱ्याकडुन कमी दराने कापसाची खरेदी केल्या जात असल्याने या भावात लागवड खर्च देखील निघणे मुश्कील आहे. - रतन मिसाळ, शेतकरी, रेलगाव

बातम्या आणखी आहेत...