आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तौक्तेचा फटका:गोव्याला तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका; रायगडात अडीच हजार नागरिकांचे स्थलांतर

रायगडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तब्बल 150 खांब, झाडे उन्मळली, गोव्यात वीजपुरवठा खंडित, कोकण रेल्वे मार्गावर झाड कोसळले

तौक्ते चक्रीवादळाचा गोव्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. जवळपास १५० ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब कोसळल्याने खासगी मालमत्तेचे नुकसान झाले. कोकण रेल्वे मार्गावर नेत्रावती एक्स्प्रेस ट्रेन मडगाववरून थिवीमकडे जात असताना या मार्गावर एक भले मोठे झाड कोसळल्याने मध्येच ही रेल्वे थांबवावी लागली. हे झाड कोसळणार हे वेळीच लक्षात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या झाडाला हटवून वाहतूक सुरळीत केल्याचे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले. या घटनेमुळे नेत्रावती एक्स्प्रेस आपल्या नियोजित वेळेपेक्षा १ तास उशिराने धावत आहे.

किनाऱ्यावरील २ हजार ४९९ नागरिकांचे स्थलांतर : अरबी समुद्रात तौक्ते चक्रीवादळ निर्माण झाले असून ते समुद्रमार्गे गुजराकडे रवाना होणार आहे. या चक्रीवादळामुळे रायगड जिल्हादेखील प्रभावित होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली असून, जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहत असलेल्या २ हजार ४९९ नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातदेखील त्याचा प्रभाव दिसणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची व वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्गमध्ये थैमान, महामार्गावर खासगी बस उलटून एकाचा मृत्यू
रायगड| तौक्ते चक्रीवादळ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी हद्दीत दाखल झाल्यानंतर या वादळामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. यामुळे खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. काही भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. या वादळाचा फटका मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीला बसला. महामार्गावर असलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने एक खासगी बस उलटली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे, तर दोघेजण गंभीर जखमी झाले.

मंगेश महादेव सावंत (४६ रा.सावंतवाडा) हे जागीच ठार झाले. तर गाडीतून प्रवास करणारे दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास भवानी मंदिर ओरोस येथे मुंबई-गोवा महामार्गावर घडला. गोवा येथून ही बस मुंबईच्या दिशेने जात होती. यानंतर महामार्गावरील वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली. दरम्यान, गरज असल्यासच नागरिकांनी घराबाहेर निघावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

पणजीत ६० ठिकाणी झाडे, घरे कोसळली
पणजी शहरात आतापर्यंत ६० हून अधिक ठिकाणी झाडे, घरांच्या भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने आतापर्यंत कुठेही जीवितहानी झाली नाही. शनिवारी सायंकाळपासून पावसाने तडाखा दिला आहे. काही ठिकाणी घरे, शासकीय आस्थापने यावरील छत वाऱ्याने उडून गेले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने दैनंदिन व्यवहार सकाळपासून ठप्प आहेत. कदंबा बसस्थानकावरील पत्रेदेखील उडून गेले.

बातम्या आणखी आहेत...