आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांनी कोविड वॉर्डात येऊ नये, अशा स्पष्ट सूचना असतानाही गुरुवारी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कोविड वॉर्डात अचानक भेट दिली तेव्हा वॉर्डात १० नातेवाईक डबे, पाणी देण्याच्या निमित्ताने आलेले आढळले. त्यांना तातडीने कोरोना केअर सेंटरमध्ये पाठवण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांची संख्या ७६१ वर पोहोचली आहे. गंभीर व अतिगंभीर ११९ रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या ठिकाणी दाखल रुग्णांसोबत नातेवाइकांनी रुग्णालयात येऊ नये, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या आहेत. मात्र त्यानंतरही रुग्णांचे नातेवाईक जेवणाचा डबा, पाणी देण्याचे कारण पुढे करून रुग्णालयात येत आहेत.
दरम्यान, गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी जयवंशी यांनी शासकीय रुग्णालयाच्या कोविड वॉर्डाला अचानक भेट दिली. जिल्हाधिकारी आल्याचे लक्षात येताच प्रशासनाची धावपळ झाली. या वेळी जयवंशी यांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या मिळणाऱ्या आरोग्यसेवा व इतर सुुविधांबाबत चर्चा केली. गंभीर व अतिगंभीर रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या आणि अतिगंभीर रुग्णांवर २४ तास लक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या वेळी काही रुग्णांजवळ त्यांचे नातेवाईक आढळून आले. या प्रकारामुळे नाराजी व्यक्त करून जिल्हाधिकाऱ्यांनी त्या १० जणांना रुग्णवाहिकेत बसवून कोविड केअर सेंटरला पाठवले.
नातेवाइकांनी गर्दी करू नये
कोविड वॉर्डामध्ये रुग्ण दाखल झाल्यानंतर त्यांना आरोग्यसेवा, जेवण, पाणी, इतर सुविधा देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. नातेवाइकांनी विनाकारण गर्दी करून संसर्ग वाढवू नये. त्या दहा जणांची रॅपिड अँटिजन चाचणी केली जाईल. ज्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत पण लक्षणे नसतील तर लिंबाळा येथील केंद्रात ठेवले जाईल. - रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी, हिंगोली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.