आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामंत्रिमंडळ विस्तार झाला नसला तरी विकास कामे अडून राहता कामा नयेत म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत आलेल्या सुमारे ४० आमदारांना प्रत्येकी २० कोटींचा निधी नुकताच िदला. २०२४ च्या निवडणुकीपूर्वी आणखी ५० कोटींचा निधी मिळेल. बंडखोरांना स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरता यावे, एवढे बळ दिले जाईल, अशी माहिती शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली.
दिव्य मराठी प्रतिनिधीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, लोकांची कामे केली तरच मतदान होईल, एवढे साधे गणित आहे. ते आम्ही उद्धव ठाकरेंना सतत सांगत होतो. पण त्याचा उपयोग होत नव्हता. नव्या मुख्यमंत्र्यांना ते सांगण्याची गरजच पडली नाही. त्यांनी स्वत:हून प्रत्येकी २० कोटींचा निधी वितरित केला आहे. त्यामुळे ४० आमदारांच्या मतदारसंघांमध्ये येत्या महिनाभरात काही कामे सुरू झाल्याचे निश्चित दिसेल. मंत्रिमंडळ विस्ताराविषयी ते म्हणाले की, ‘मंगळवारी शपथविधी होण्याची दाट शक्यता आहे. त्यात माझा समावेश असेल. समाजकल्याण विभाग, औरंगाबादचे पालकमंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा आहे. बंडाविषयी ते म्हणाले की, हिंदुत्व हाच राज्यातील प्रमुख मुद्दा आहे आणि तो भाजपकडून आणखी तीव्र केला जाणार. त्याचा २०२४ मध्ये शिवसेनेला मोठा फटका बसेल, असे माझा अनुभव मला वारंवार सांगत होता. बंड फसले तर आपले राजकीय जीवन संपुष्टात येईल, याचीही तयारीही आम्ही केली होती.’
स्वत: सोन्याच्या सिंहासनावर बसून भाजपला नियंत्रणात ठेवण्याची उद्धव यांना संधी होती
शिरसाट म्हणाले, ‘खरे तर शिंदेंना मुख्यमंत्री करत स्वत: सोन्याच्या सिंहासनावर बसून शिंदेंमार्फत भाजपला नियंत्रणात ठेवण्याची उद्धव यांना सुवर्णसंधी होती. ते फक्त पक्षप्रमुख राहिले असते तर राष्ट्रवादी, काँग्रेसचे बडे नेते शिवसेनेत आले असते. दुर्दैवाने तसे झाले नाही. कारण त्यांनी फक्त रश्मी ठाकरे, सुभाष देसाई, अनिल देसाई आणि अनिल परब यांचेच ऐकण्याचे ठरवले होते. शिवसेना फुटीसाठी संजय राऊत पूर्ण जबाबदार नाहीत, पण ते अतिमहत्त्वाकांक्षी होत चालले होते. महाविकास आघाडी सरकार ताब्यात घेऊ पाहत होते. राऊत कधीच उद्धवजींच्या गुड बुकमध्ये नव्हते.’
ग्रामपंचायत निकालानेच सिद्ध केले की आम्ही गद्दार नाही
युतीच्या मतदारांसाठी हिंदुत्व महत्त्वाचे आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राहून ते टिकूच शकत नाही, हे उद्धव आणि आदित्य यांना कळेल तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. ग्रामपंचायत निवडणुकीत आमच्या आमदारांना मोठे यश मिळाले. हा निकष फार मोठा नाही, पण शिंदे गट गद्दार नाही, ते हिंदुत्वाशी बांधील आहेत, हे जनतेने मान्य केले असा अर्थ निघतो. पण ते उद्धव आणि आदित्यना कळत नाही, याचे वाईट वाटते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.