आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Devendra Fadanvis Writes Letter To CM Uddhav Thackeray, It Is Not Appropriate To Create A Virtual Picture That The Corona Is Declining When The Corona Infection Rate Is Above 15%

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र:कोरोनाचा संसर्गदर 15 टक्क्यांच्या पुढे असताना कोरोना कमी होतोय्, असे आभासी चित्र तयार करणे योग्य नाही

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले आहे

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. 'मुंबईसह राज्यात कमी होत असलेल्या चाचण्या, आरटी-पीसीआर चाचण्यांचे प्रमाण कमी, संसर्ग वाढण्याचा धोका, राज्यातील एकूण मृत्यूंपैकी 20 टक्के मृत्यू मुंबईत होऊन सुद्धा जुन्या नोंदी अपडेट न होणे, त्यातून नेमकी माहिती कोरोना लढ्यासाठी उपलब्ध न होणे...'असे फडणवीसांनी आपल्या पत्रात मांडले आहे.

देवेंद्र फडणवीस आपल्या पत्रात पुढे म्हणतात की, 'मागच्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत कमी संख्येने चाचण्या केल्या जात असल्याबद्दल मी संपूर्ण आकडेवारीसह आपणाशी पत्रव्यवहार केला होता. आज दुसर्‍या लाटेची तीव्रता अधिक असताना पुन्हा एकदा काही बाबी आपल्या निदर्शनास आणून देणे, हे मी माझे कर्तव्य समजतो. मुंबईत गेल्या 8 दिवसांत अतिशय कमी चाचण्या झाल्या आहेत. 19 एप्रिलला 36,556, 20 एप्रिलला 45,350, 21 एप्रिलला 47,270, 22 एप्रिलला 46,874, 23 एप्रिलला 41,826, 24 एप्रिलला 39,584, 25 एप्रिलला 40,298, 26 एप्रिलला 28,338 अशा चाचण्या झाल्या आहेत, त्याची सरासरी 40,760 इतकी आहे.'

'नागपूर जिल्ह्यात 40 लाख लोकसंख्येत या कालावधीतील ही सरासरी 26,792 चाचण्या प्रतिदिन अशी असून 68 लाखांच्या पुण्यात 22 हजार चाचण्या प्रतिदिन इतकी आहे. या शहरांच्या तीन ते चारपट लोकसंख्या असलेल्या मुंबईत केवळ 40 हजार प्रतिदिन चाचण्यांनी शहराचे नेमके चित्र लक्षात येणार नाही आणि त्यातून कोरोना स्थिती हाताळणे भविष्यकाळात पुन्हा कठीण होऊन बसेल. आरटीपीसीआर आणि अँटीजन चाचण्यांच्या प्रमाणाचा विचार केला तर राज्यात जवळजवळ 40 टक्के चाचण्या या अँटीजेन पद्धतीने होत आहेत.'

26 एप्रिलला नोंदलेल्या मुंबईतील 28 हजार चाचण्यांमधील 40 टक्के अँटीजेन चाचण्या गृहित धरल्या तर केवळ 16,800 आरटी-पीसीआर चाचण्या मुंबईत होत आहेत. इतक्या कमी संख्येत जर आरटीपीसीआर चाचण्या होत असतील, तर मुंबईचे नेमके चित्र डोळ्यापुढे येऊच शकणार नाही. मुंबईचा संसर्ग दर हा सातत्याने 14 ते 18 टक्के असताना आणि राज्याचा संसर्ग दर 25 ते 27 टक्क्यांच्या आसपास राहत असताना एकूणच कमी चाचण्या आणि त्यातही कमी आरटीपीसीआर चाचण्या हे अजीबात परवडणारे नाही.'

'रविवारी 25 एप्रिलला 2021 राज्यात एकूण 2,88,281 चाचण्या नोंदविण्यात आल्या. त्यातील 1,70,245 आरटी-पीसीआर चाचण्या होत्या (59 टक्के), तर 1,18,036 चाचण्या या रॅपिड अँटीजेन (41 टक्के). तसेच सोमवारी 26 एप्रिल रोजीचे सुद्धा चित्र असेच आहे. त्यादिवशी 37 टक्के अँटीजेन चाचण्या आहेत. आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण 70 टक्क्यांच्यावर हवे, असे केंद्र सरकारच्या वतीने सातत्याने सांगितले जात असताना सुद्धा त्याचे पालन होताना दिसत नाही.'

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणतात की, 'आपल्याला जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ द्यायचे नाही. कोरोना कमी व्हावा, ही आपल्या सर्वांचीच इच्छा आहे. मात्र, संसर्गदर 15 टक्क्यांच्या पुढे असताना कोरोना कमी होतोय्, असे आभासी चित्र तयार करणे योग्य होणार नाही. कोरोना लाटेची सायकल आपण राज्यात, देशात आणि जगात अनुभवली आहे. या सायकलदरम्यान आरोग्य सेवा आणि रूग्ण व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. शिखरावर गेल्यावर पुन्हा रूग्णसंख्या मॉडरेट होते आणि कमी झाल्यावर श्रेयाचे दावेही जनतेने बघितले आहेत. परंतू महत्त्वाचे हे की, हा शिखरावरचा वेळ कमीत कमी कसा करता येईल आणि त्यादरम्यान आपत्ती कशी कमी करता येईल, हे अधिक महत्त्वाचे आहे', असे फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...