आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान पाहणी दौरा:फडणवीसांचा ‘वादळी’ कोकण दौरा;अडीच तासांमध्ये 4 ठिकाणी भेट

महेश जोशी. नितीश गोवंडे | अलिबाग / रोहा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाच्या नियमांना हरताळ, सरकारच्या आधी घाईगडबडीत उरकला दौरा

तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आता राजकीय दौरे सुरू झाले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यात आघाडी घेतली असून सरकार विचारात असतानाच त्यांनी बुधवारी रायगड जिल्ह्याचा दौरा केला. अलिबागसह ६० किलोमीटर अंतरातील ३ गावांत अवघ्या अडीच तासात त्यांनी चार ठिकाणी भेटी दिल्या. प्रत्येक ठिकाणी फार तर ८ ते १३ मिनिटे वेळ दिला. यामुळे फडणवीस यांचा दौरा “चक्रीवादळ पर्यटन’ ठरले आहे. विरोधी पक्षनेता येणार म्हणून चारही ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. गर्दीमुळे कोरोनाच्या नियमांचा फज्जा उडाला. फिजिकल डिस्टन्सिगच्या नियमांना हरताळ फासण्यात आला. दुपारी १२ वाजता मुंबईतील सागर निवासस्थानाहून कारने निघाल्यावर ते ३ वाजता रायगडला पोहचले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर त्यांच्यासोबत होते.

१५ मिनिटांत बैठक गुंडाळली : वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी फडणवीस दुपारी ३:१० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी अलिबाग, श्रीवर्धन, मसाळा आणि पोलादपूर येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती दिली. अवघ्या १५ मिनिटांत बैठक संपवून ते कोळीवाडी परिसरातील बंदराची पाहणी करण्यासाठी पोहोचले. कोळी बांधवांनी त्यांच्यासमोर समस्या मांडल्या. १३ मिनिटे थांबून ते येथून पुढील प्रवासाला निघाले.

तीन गावांना भेटी
साधारण तासाभराचा प्रवास करत फडणवीस ४: ५८ वाजता उसर गावात पोहोचले. या ठिकाणी चक्रीवादळामुळे पाण्याची टाकी कोसळली होती. एका ग्रामस्थाने त्यांना नुकसानीची माहिती दिली. लगेच त्यांचा ताफा वावे गावाच्या दिशेने निघाला. एका घराचे पत्रे उडून गेले आहेत. त्याची पाहणी केली. येथे ५:०५ ते ५:१८ असे १३ मिनिटे ते थांबले. परत तासाभराचा प्रवास करत ६:१५ वाजता रोहा तालुक्यातील मेढा गावात पोहचले. येथे आयुष्मान भारतअंतर्गत बांधण्यात आलेल्या आरोग्य केंद्राचे सलग दुसऱ्यांदा पत्रे उडाले आहेत. येथून त्यांचा ताफा महाडला मुक्कामी पोहोचला.

मुख्यमंत्री, मुंबईत तर बघा
फडणवीस यांच्या दौऱ्याचे कौतुक करताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. “तौक्तेची मदत व आधार देण्यासाठी पंतप्रधान गुजरातेत तर देवेंद्र फडणवीस कोकणात पोहोचले. तुम्ही आमचे कुटुंबप्रमुख आहात. किमान मुंबईत तर दौरा करा, त्रस्त जनता मातोश्रीबाहेर आंदोलन करतेय. आता तरी निघा,’ अशी खोचक टीका त्यांनी सोशल मीडियाद्वारे केली आहे.

गतवर्षीच्या केवळ ३ ते ४ मागण्या पूर्ण
गेल्या वर्षी ३ जून रोजी कोकणाला निसर्ग चक्रीवादळाने झोडपले होते. त्याची पाहणी करण्यासाठी फडणवीस आणि दरेकर यांंनी कोकण दौरा केला होता. १३ जून रोजी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना १९ मागण्यांचे निवेदन दिले हाेते. त्यापैकी ३-४ मागण्या वगळता एकही पूर्णत्वास गेलेली नाही. मागील मागण्या अपूर्ण असताना पुन्हा नव्याने त्याच मागण्या करण्यात आल्या आहेत.

नवी घरे बांधताना वादळ सहनशील बांधा
सरकारी बांधकाम म्हटले तर ते एकाच पद्धतीने केले जाते. पण कोकणात सातत्याने वादळामुळे बांधकामांचे नुकसान होेते. ते टाळण्यासाठी प्रशासनाकडून नव्याने बांधकामाची रचना करणे गरजेचे आहे. यामुळे भविष्यातील नुकसान टाळले जाईल.- देवेंद्र फडणवीस

बातम्या आणखी आहेत...