आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनात नवरात्रोत्सव:यंदा गरबो रमतो ना जाए; नवरात्रोत्सवासाठी राज्याच्या गृह विभागाची नियमावली जारी

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रावणदहन सोशल मीडियावरच पाहा, दर्शन सुविधाही ऑनलाइन

नवरात्राेत्सवाची आतुरतेेने वाट पाहणाऱ्या तरुणाईला यंदा गरबा, दांडिया खेळण्याचा आनंद लुटता येणार नाही. कोरोनामुळे उद्भवलेली संसर्गजन्य परिस्थिती लक्षात घेता या वर्षी गरबा व दांडियाचे आयोजन करण्यावर यंदा बंदी घालण्यात आली असून रावणदहनाच्या कार्यक्रमास गर्दी करू नये, अशी तंबी दिली आहे. दरम्यान, ऑटोरिक्षाचालकांनी विनामास्क प्रवाशांना आपल्या वाहनात बसू देऊ नये यासाठी राज्यभर ‘नो मास्क नो सवारी’ उपक्रम राबवला जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबाबत सूचना दिल्या आहेत.

नवरात्रोत्सव, दुर्गापूजा आणि दसरा सण साजरा करण्यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचना मंगळवारी राज्याच्या गृहविभागाने जारी केल्या. त्यानुसार सार्वजनिक नवरात्र उत्सवमूर्ती ४ फुटांपेक्षा तर घरगुती २ फुटांपेक्षा मोठी नसावी, अशी सूचना करण्यात आली असून देवी मिरवणूक काढता येणार नाही, असे गृह विभागाने म्हटले आहे.

रावणदहन सोशल मीडियावरच पाहा

दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावणदहन कार्यक्रम प्रतीकात्मक करण्यात यावा. दहन कार्यक्रमाला गर्दी होणार नाही, सुरक्षित शारीरिक अंतर नियमावली पाळली जावी तसेच सोशल मीडियाद्वारे थेट प्रक्षेपण पाहण्याची सुविधा करण्यात यावी,असे गृह विभागाने सुचवले आहे.

दर्शन सुविधाही ऑनलाइन

देवीच्या दर्शनाची सुविधाही ऑनलाइन, केबल नेटवर्क, सोशल मीडिया आदीद्वारे उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना केली आहे. सार्वजनिक उत्सवाच्या ठिकाणी मंडपातील दर्शनरांगेत फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पाळावा लागेल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मंडपस्थळी सॅनिटायझरचा वापर करावा लागणार आहे.

देवीच्या मंडपात केवळ ५ कार्यकर्ते

देवीच्या मंडपात एकावेळी ५ कार्यकर्ते असावेत, मंडपात खानपान सुविधा असू नये. आरती, भजन, कीर्तन आदींचे आयोजन करताना गर्दी होऊ नये याकडे लक्ष द्यावे, देवीच्या मंडपात थर्मल स्क्रीनिंग आणि निर्जंतुकीकरणाची व्यवस्था असावी, अशा सूचना या परिपत्रकात आहेत.

मार्गदर्शक सूचना

१. सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवनागी घेणे आवश्यक राहील.

२. कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच मा. न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.

३. या वर्षांचा नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक देवी मुर्तीची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी.

४. देवीच्या मुर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुतो देवीच्या मुर्तीची उंची २ फूटांच्या मर्यादेत असावी.

५. या वर्षी शक्यतो पारंपारिक देवी मुताऐवजी घरातील धातु/संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मुर्ती शाडूची/पर्यावरण पूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्याने कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.

६. नवरात्रोत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी.

७. गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित कर नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी.

८. आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदीचे पालन करण्यात यावे.

९. देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.

१०. देवीच्या मंडपांमध्ये निर्जंतुक करणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारिरीक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सिंग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सँनीटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

११. देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील,इमारतीतील सर्व घरगुती देवी मुर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये.

१२. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी. तसेच नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय मूर्ती स्विकृती केंद्राची व्यवस्था करावी व याबाबत जास्तीत जास्त प्रसिध्दी करण्यात यावी. १३. मंडपात एकावेळी ५ पेक्षा जास्त कार्यकत्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपामध्ये खाद्यपदार्थ अथवा पेयपानाची व्यवस्था करण्यास मनाई असेल.

१४. विसर्जनाच्या तारखेस जर घरगुती तसेच सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्रात असेल तर, मूर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई असेल.

१५. दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून प्रतिकात्मक स्वरुपाचा असावा. रावण दहनाकरिता आवश्यक तेवढ्या किमान व्यक्ती कार्यक्रमस्थळी हजर राहतील, प्रेक्षक बोलावू नयेत, त्यांना फेसबुक इत्यादी समाज माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे बघण्याची व्यवस्था करावी.

१६. कोविड- १९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना गृह विभागाने जाहीर केल्या आहेत. त्या सूचनांचे सर्वांनी तंतोतंत पालन करून शासन, प्रशासनास सहकार्य करावे व कोरोना विरुद्धच्या युद्धात सर्व घटकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री. देशमुख यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...