आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयातील गैरहजर वैद्यकिय अधिकारी बडतर्फ, मेडीकल कौन्सील कडील नोंदणी रद्द करण्याचीही शिफारस

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तीन वेळा पत्र व्यवहार करून देखील ते हजर झाले नाही.

कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात अनाधिकृतरित्या गैरहजर असलेल्या वैद्यकिय अधिकाऱ्याचा (भिषक) बडतर्फी तसेच मेडीकल कौन्सील कडील नोंदणी रद्द करण्याची शिफारस जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे बुधवारी केली आहे. त्यामुळे आता संबंधित वैद्यकिय अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार याकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागले आहे.

याबाबत रुग्णालयाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात मागील दोन वर्षापासून डॉ. राजशेखर मेनगुले हे वैद्यकिय अधिकारी (भिषक) या पदावर कार्यरत होते. कोविडच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या काळात त्यांना हिंगोली येथील डेडीकेटेड कोविड रुग्णालयात तात्पुरत्या स्वरुपात काम करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी हिंगोली येथे कामही सुरु केले होते.

मात्र कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्या ठिकाणी वैद्यकिय अधिकाऱ्याची (भिषक) गरज असल्याने डॉ. मेनगुले यांना 6 एप्रिल 2021 रोजी मुळ पदावर कळमनुरी येथे रुजू होण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र अद्यापही ते कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात रुजू झाले नाही. त्यांनतर तीन वेळा पत्र व्यवहार करून देखील ते हजर झाले नाही. त्यामुळे आज जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे पत्र पाठवले आहे. डॉ. मेनगुले हे कोविड आपत्तीच्या काळात गैरहजर असल्याने रुग्णांना तातडीने उपचार मिळणे कठीण झाले आहे. त्यांना साथरोग प्रतिबंधक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत तातडीने हजर होण्याच्या सुचना दिल्यानंतरही ते हजर झाले नाही. त्यामुळे त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करावी तसेच त्यांचे महाराष्ट्र मेडीकल कौन्सीलकडील नोंदणी रद्द करण्याबाबत कार्यवाही करावी असे या पत्रात नमुद केले आहे.

बातम्या आणखी आहेत...