आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कोरोना'ची गावकथा:दोन महिन्यांत 85 लोकांचा मृत्यू, आरोग्य विभागाकडे नोंद तिघांचीच

गणेश सुरसे,मंदार जोशी | देव्हाडी (जि. भंडारा)4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोविड सेंटरअभावी देवाचा धावा; हतबल ग्रामस्थांचा घटांवर भरवसा

‘दोन महिन्यांपासून गावावर महामारीचे संकट आले. एक दिवसाआड कोणाच्या न कोणाच्या मृत्यूची बातमी धडकते. डोळ्यांसमोर गावातले चांगले लोक जात आहेत. मोठ्या माणसांसोबतच काही लहान मुलेही दगावली. आता हे सहन होत नाही. प्रशासन गावात आलं नाही. माणसं मरू लागलीत. अखेर आम्ही देवीला साकडं घातलं. दिवसांचे घट बसवले’, असे बोलता बोलताच धिप्पाड शरीरयष्टीचे रतिराम लहान लहान मुलांसारखे हमसून रडू लागले.

‘दिव्य मराठी’ची टीम मंगळवारी (१८ मे) भंडारा जिल्ह्यातील देव्हाडीत पोहोचली. आपल्यातील माणसं गेल्याचे दु:ख गावातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. पाणावलेल्या डोळ्यांनी हे ग्रामस्थ विचारतात ‘यात आमचा दोष तो काय ?’ मागील दोन महिन्यांत गावात ८५ लोकांचा अचानक मृत्यू झाला.

कोविड सेंटरअभावी देवाचा धावा, हतबल...
अनेक लोक अंथरुणाला खिळून आहेत. गावात दवाखाना आहे, पण तो आमच्या कामाचा नाही, असे लोक सांगू लागले. पाच हजार लोकसंख्येच्या देव्हाडीत आतापर्यंत आठशे लोकांची कोरोनाची चाचणी झाली आहे. सरपंच चैनलाल मसरगे यांनी सांगितले की, ‘आजवर २५० लोक कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. ८५ लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील अनेकांना कोरोनाची लक्षणे होती. मात्र त्यांची चाचणी करण्यात आली नाही. त्यामुळे प्रशासनाकडे त्यांची नोंद नाही. आजही दहा ते पंधरा रुग्ण उपचार घेत आहेत. प्रशासन तपासण्याच करत नाहीत. मृत्यूची साखळी थांबावी याकरिता प्रथमच गावात देवीचे घट बसवले. आजूबाजूच्या काही गावांतही घट बसवण्यात येत होते. आमच्या गावात ही प्रथा नव्हती. मात्र गावातील मृत्यूंचे सत्र थांबता थांबेना, डॉक्टरांच्या औैषधाला गुण येईना म्हणून आम्ही घटस्थापना केली. सातव्या दिवशी भंडारा आयोजित केला आहे.

सात सरणं एकाच दिवशी रचली
आमच्या गावात एकाच दिवशी सात सरणं रचली गेली. लोकप्रतिनिधींनी आम्हाला वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे आमच्याकडे आता देवाला शरण जाण्याशिवाय पर्याय नाही. आम्ही अंधश्रद्धाळू नाही. पण आता आमचा देवच वाली आहे. - चैनलाल मसरगे, सरपंच

प्रत्येक गावात सेंटर कसे देणार?
देव्हाडीत कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. उपचारासाठी गावात स्वतंत्र प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तेथे २४ तास सेवा देण्याचे आदेश सबंधित डॉक्टरांना दिले आहेत. तसे झाले नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. पण प्रत्येक गावाला कोविड सेंटर कसे द्यायचे? - एम. ए कुरेशी, तालुका आरोग्य अधिकारी

प्रशासकीय आकड्यांचा कुठेच ताळमेळ लागेना
ग्रामस्थ मागील महिन्यात ८५ लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगतात. या मृत्यूंची नोंद ग्रामपंचायतीत करण्यात आली आहे. अनेकांचा घरीच उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी झालीच नाही. तालुका आरोग्य अधिकारी एम. ए. कुरेशी यांना विचारले असता त्यांनी देव्हाडीत कोरोनामुळे तीन लोकांचाच मृत्यू झाल्याचे सांगितले. प्रशासन आणि गावकऱ्यांच्या अाकड्यांतील तफावत कोरोनाचे वास्तव समोर आणणारी आहे.

देव्हाडीच्या आरोग्य केंद्रात रुग्णभरतीची साेय नाही
देव्हाडीत प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तेथे दोन डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. स्वतंत्र औषधालय आणि कर्मचाऱ्यांसाठी क्वार्टर आहे. तरीही कर्मचारी तेथे राहत नसल्याने तेथे कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. ‘दिव्य मराठी’ टीमने एका डॉक्टरकडे उपचाराखालील रुग्ण आणि मृत्यूंबाबत माहिती विचारली असता ते उत्तर देऊ शकले नाही. कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत विचारले असता तालुक्यातील कोविड सेंटर रिकामे असताना गावात कशाला, असे उत्तर आरोग्य अधिकाऱ्यांकडून मिळाले.
देव्हाडीसह शेजारील गावांतही होमहवनावर भर

बातम्या आणखी आहेत...