आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तौक्तेचे तांडव:कोरोना, निसर्गच्या नुकसानीच्या धक्क्याने वडील गेले, तौक्तेने हापूसची बाग हिरावली... जगायचे कसे... त्रस्त मुलापुढे प्रश्न

महेश जोशी, नितीश गोवंडे | गुहागर / चिप‌ळूण / राजापूर/दापोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘तौक्ते’नंतरचे कोकण : आंबा, नारळाची झाडे कोसळली, ऐन हंगामात मोठे नुकसान - Divya Marathi
‘तौक्ते’नंतरचे कोकण : आंबा, नारळाची झाडे कोसळली, ऐन हंगामात मोठे नुकसान
  • देशातील ‘हापूस हब’ला सलग दुसऱ्या वर्षीही बसला चक्रीवादळाचा फटका

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट
गेली २० वर्षे हापूसने भरभरून दिले. त्यामुळेच जानेवारीत असगोली येथे कर्ज घेऊन टुरिस्ट होम उभारले. अडीच महिने चांगला जम बसला. पण मार्चमध्ये कोरोना आला आणि धंदा बसला. झालेले नुकसान आंब्यातून भरून निघेल, अशी अपेक्षा होती. पण जूनमध्ये आलेल्या निसर्गने सर्वकाही हिरावले. कर्ज आणि नुकसानीचा बाबांनी धसका घेतला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने त्यांचा बळी घेतला. यंदा ५० टक्के पीक कमी असताना “तौक्ते’ने तेही हिरावले. सांगा जगायचे कसे? असा प्रश्न गुहागर तालुक्यातील मंगेश साळके यांना पडलाय.

नॅशनल मँगाे डेटाबेसच्या माहितीनुसार जगातील १११ देशात आंब्याचे उत्पादन हाेते. पैकी ४५ टक्के उत्पादन एकट्या भारतात होते. यापैकी ८० टक्के हापूसची लागवड कोकणातल्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील सावंतवाडी, मालवण, देवगड, राजापूर, गुहागर, मंडनगर येथे होते. येथील २८ ते ३० हजार शेतकरी १ लाख ८२ हजार हेक्टरवर वर्षाकाठी २ लाख ७५ हजार मेट्रिक टन हापूसची लागवड करतात. एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात ६६ हजार हेक्टरवर आंबे, २७ हजार हेक्टरवर काजू तर ५.५ हजार हेक्टरवर नारळाची शेती होते. “तौक्ते’ चक्रीवादळाचा यास मोठा फटका बसला आहे. मंगेश साळके त्यापैकीच एक.

३०० झाडे कोसळली
कोळथरे (ता. दापोली) येथील सुबोध कोझरेकर यांची नारळाची २५०, सुपारीची १२०० झाडे आहेत. गेल्या वर्षी नारळाच्या ४५ तर सुपारीच्या २५० झाडांचे नुकसान झाले. पण शेकड्यात मदत मिळाली. तौक्तेमुळे नारळाची ६ तर सुपारीची ४ झाडे उन्मळून पडली. मागील मदतीपासून निराशा झाली. यंदा बघू काय होते ते? असे कोझरेकर म्हणाले.

नुकसान झाले, पण मदत नको
पवार साक्री येथील राजेश शेटे म्हणाले, गेल्या वर्षी नारळाच्या झाडांवर वीज पडली. पंचनामे झाले, पण सरकारकडे नोंद नाही झाली. सरकार आम्हाला शेतकरी समजत नाही. यंदा पंचनाम्यासाठी आले तर त्यांना हाकलून देऊ. १०० रुपये भरपाई घेण्यासाठी आम्ही भिकारी नाही.

झाडे हलले की नुकसान
गुहागरचे चार वेळेस आमदार राहिलेले डॉ. विनय नातू यांच्या मार्गताम्हाणी येथे १७ एकरवर आंबा, काजूच्या बागा आहेत. ते म्हणाले, आंब्याला फळ लागायला १० वर्षे लागतात. काजू, आंबा वर्षोनुवर्षे फळ देतात. झाडे उन्मळून पडले तर खूप मोठे नुकसान होते.
तौक्ते वादळामुळे नारळाची झाडे उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.

संकटात जगायचे कसे?
मंगेश साळके यांची असगोली (ता. गुहागर) येथे आंब्याची १७०० झाडे आहेत. २२ लाखांचे कर्ज घेऊन “सी व्ह्यू टूरिस्ट होम’ सुरू केले. लॉकडाऊनने पर्यटनाचे तर गेल्या वर्षी निसर्गने आंब्यांचे नुकसान केले. मंगेश यांचे वडील गजानन यांनी धसका घेतला. बँकेत चकरा मारून कर्जाचे हप्ते कमी करण्यासाठी विनवण्या केल्या. त्यात कोरोना कधी घरात आला समजलेच नाही. सगळेच पॉझिटिव्ह झाले. त्यात गजानन यांचा बळी गेला. पुन्हा “तौक्ते’ने नवीन संकट आणले. प्रशासन पंचनामे करेल, भीक दिल्यासारखी मदत करेल, पण आज जगायचे कसे, असा प्रश्न पडलाय.

बागांसाठी अनुदान द्या
डॉ. नातू म्हणाले, निसर्गमध्ये बागांचे नुकसान झाले. सरकार पिकांचे नुकसान देते. पण बागांच्या नुकसानीला कोणी विचारत नाही. बागा मोकळ्या करण्यात खूप पैसा जातो. सरकारने त्यासाठी खास भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी गेल्या वर्षी सरकारकडे केली होती. त्याकडे लक्ष दिले नाही.

बातम्या आणखी आहेत...