आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Divya Marathi Ground Report Of Kadholi Village In Kamthi Taluqa, District Nagpur, The Villagers Set Up Covid Care Center In The Village With A Subscription Of Rs. 70,000

'कोरोना'ची गावकथा:गावकऱ्यांनी 70 हजारांच्या वर्गणीतून गावातच उभारले कोविड केअर सेंटर

गणेश सुरसे, मंदार जोशी | कढोली (ता. कामठी, जि. नागपूर)4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 90% लसीकरण, दहा दिवसांत एकही रुग्ण नाही; रुग्णांना बेड मिळत नसल्याने गावातच केली सोय

वाढत्या रुग्ण संख्येमुळे राज्यात कोरोना रुग्णांना बेड मिळत नाही, इंजेक्शनसाठी वाटेल ती किंमत मोजावी लागत आहे. ही वेळ आपल्या गावावर येऊ नये. त्यासाठी शासकीय मदतीचीही वाट न पहाता नागपूर जिल्ह्यातील कढोली गावकऱ्यांनी पुढाकार घेत गावातच स्वत:चे कोेविड केअर सेंटर (सीसीसी) उभारले. २० खाटांच्या या सेंटरमध्ये ऑक्सिजनचीही सोय आहे. यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेत माजी सरपंच व गावकऱ्यांना एकत्र करत सर्व राजकीय मतभेद विसरून कोविड दक्षता समिती स्थापन केली. या सेंटरमध्ये आतापर्यंत गावातील १६ रुग्णांवर मोफत उपचार झाले आहे. या गावचा आदर्श घेऊन आजू बाजूच्या गावांनीही असा उपक्रम राबवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

कामठी तालुक्यात नागपूर - भंडारा रस्त्यावर पाच हजार लोकवस्तीच्या कढाेली ग्रामपंचायतीत सर्व सदस्य तरुण आहेत. त्यांनी गावातून काेराेना हद्दपार करण्याचा निर्धार केला. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून काम सुरू केले. महामार्गावरील गाव आणि गावातील ७० टक्के लोक कंपन्यांत कामाला जात असल्याने त्यांचा इतरांशी संपर्क जास्त असल्यामुळे चाचणी आणि लसीकरणावर भर देणे आवश्यक होते. हे लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने पाच किलोमीटरवर गावात जाऊन वृद्धांना रिक्षाने नेऊन लस देऊन आणली. तर ४५ वर्षीय वरील नागरिकांसाठी गावातच तीन लसीकरण शिबिरे घेतली. जो लस घेईल त्यालाच शासकीय सुविधांचा लाभ मिळेल, असे पत्रकही ग्रामपंचायतीने काढले. त्यामुळे लशीची भीती वाटत असतानाही गावकऱ्यांनी लशीचे दोन्ही डोस घेतले. सध्या गावात ९० टक्के लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती सरपंच प्रांजल वाघ यांनी दिली.

अंगणवाडीला बनवले चाचणी केंद्र, ऑक्सिजनची सुविधा

लोकवर्गणीचे आवाहन केल्यानंतर तासाभरात ७० हजार रुपये वर्गणी जमा झाली. २० खाटा आणि तीन ऑक्सिजन सिलिंडर खरेदी करून शाळेत कोविड सेंटर उभारले. प्राथमिक आरोग्य केंद्रातून दररोज एक डॉक्टर या केंद्राला भेट देईल असे नियोजन केले. अनेक गावकऱ्यांनी या कोविड सेंटरसाठी विविध औषधे व वस्तूही भेट दिल्या.

गावातच रुग्णांची सोय
गावकऱ्यांच्या पुढाकारामुळे गावातच कोविड केअर सेंटर सुरू झाले. प्रशासन आणि गावकऱ्यांशी समन्वय साधण्याचे काम ग्रामपंचायतीने केले. त्यामुळे कोरोना रुग्णांची सोय गावातच झाली. - ब्रह्मानंद खडसे, ग्रामसेवक, कढोली

तरुण ग्रामपंचायत
कढोलीच्या सरपंच प्रांजल वाघ यांच्यासह ग्रामपंचायतीतील बहुतांश पदाधिकारी व सदस्य चाळीशीच्या आतील आहेत. तरुणांच्या साथीमुळे विकास कामे करण्याचा उत्साह निर्माण झाला. काही वर्षांतच या तरुणांनी गावाचे रूप पालटवले. आतापर्यंत या ग्रामपंचायतीने केंद्र, राज्य व विविध संस्थांची ७० लाख रुपयांची बक्षिसे मिळवली आहेत.

नकारात्मक मेसेजवर बंदी
ग्रामपंचायतीने गावकऱ्यांसाठी स्वतंत्र व्हॉट्सअॅप ग्रुप, फेसबुक पेज तयार करून त्यावर प्रबोधन केले. कोरोनासंदर्भातील नकारात्मक पोस्ट टाकणाऱ्यांवर बंदी केली. गावातील बाकड्यांवर कोणी गर्दी करू नये यासाठी काळे ऑइल टाकले. पोलिसांनीही कारवाई केेली. दंडाच्या रकमेतून ठाण्यात सॅनिटायझर वेंडिंग मशिन देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...