आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंब्यांचा व्यापार संकटात:आंब्यांची 100 कोटींची उलाढाल असलेल्या देवगडला महामारीचा फटका, तौक्ते वादळानेही केले नुकसान

मंगेश फल्ले,मनोज व्हटकर | देवगड ( सिंधुदुर्ग)4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामसंडे येथील कॅनिंग सेंटरवर दाखल झालेला हापूस आंबा. - Divya Marathi
जामसंडे येथील कॅनिंग सेंटरवर दाखल झालेला हापूस आंबा.
  • कोरोनाच्या कटू अनुभवांत हरवला देवगडच्या हापूस आंब्यांचा गोडवा

देशातील हापूस आंबा उत्पादक परिसर म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्याची ओळख आहे. देश-परदेशात येथील आबा जात असल्याने बाजारपेठेची आर्थिक उलाढाल १०० कोटींवर असते. मात्र कोरोनासोबतच नैसर्गिक संकटामुळे दोन्ही हंगामांत आंबा उत्पादक शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागला. उल्लेखनीय बाब म्हणजे देवगडला पर्यटक येत नसतानाही कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असल्याने हापूस आंब्यांचा व्यापार संकटात सापडला.

देवगड आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे चेअरमन अजित गोगटे यांनी सांगितले की, मागील वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाले आणि आंबा व्यावसायिकांना निर्यातीत अडचणी आल्या. त्यातच डिसेंबरपर्यंत पावसाळा लांबल्याने या वर्षी मोहोर विलंबाने लागल्याने आंबा उत्पादनही उशिराने हाती येत आहे. यंदा उत्पादनात २० ते २५ टक्के घट झाल्याचे दिसून येते. अद्याप झाडावर ३० ते ४० टक्के आंबा शिल्लक असताना ‘तौक्ते वादळा’ने बागांचे प्रचंड नुकसान झाले. देशात विविध भागात लॉकडाऊन असल्याने आंब्यांची वाहतूक करण्यात अडचणी येत आहेत. या भागात १५ ते २० हजार आंबा उत्पादक शेतकरी असून हंगामात ४० हजार टनापर्यंत आंबा उत्पादित होतो. मागील लॉकडाऊनमध्ये काही आंबा उत्पादक शेतकरी आणि वेगवेगळया शहरातील ग्राहक असा थेट संपर्क झाल्याने दलाल वगळता आंबा संबंधित ठिकाणी पाठवता आला. ऑनलाइन विक्रीतून दरवर्षी देशातील १६० शहरांपर्यंत आंबा पोहोचवून ५० ते ५५ लाखांचा व्यवसाय होत असे. परंतु या वेळी ग्राहकांपर्यंत पार्सल न पोहोचवू शकल्याने ऑर्डर मिळूनही ग्राहकांना पैसे परत करावे लागले.

दहा रुपये किलोपर्यंत भाव घसरले

वादळानंतर ठिकठिकाणी आंबे मोठ्या प्रमाणात पडून खराब झाले. जामसंडे गावातील आंबा निर्यातदार मारुती माने यांच्या कॅनिंग सेंटरवर पोतीच्या पोती भरून आंबे आणले जात होते. एरव्ही ३२ रुपये किलो दराने विकला जाणारा आंबा दहा रुपये किलो दराने विकला गेला. तो विविध शहरांत पाठवण्याची लगबग सुरु होती. कोरोनामुळे आंब्यांचे दर पडले, असे कॅनिंग व्यावसायिक बाळकृष्ण कानवेकर यांनी सांगितले. पर्यटन बंद तरी कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव

कोरोनाने ५६ जणांचा मृत्यू
देवगड परिसरात आतापर्यंत २ हजार ३४१ कोरोना रुग्ण मिळून आले. त्यापैकी १६०० रुग्ण बरे झाले आहेत, तर ५६ जणांचा मृत्यू झाला. सध्या ६८५ रुग्ण उपचार घेत असून १०० बेडचे एक कोविड सेंटर देवगड येथे कार्यान्वित केले आहे. पर्यटन बंद असले तरी कोल्हापूर, गोव्याला लोकांची ये-जा सुरू असते. नागरिक पुरेशी काळजी घेत नाहीत. -डॉ. संतोष कोंडके, वैद्यकीय अधिकारी देवगड .

बातम्या आणखी आहेत...