आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Divyamarathi Ground Report, Negligence Of Private Doctors, Hampering Half The Village; 52 Deaths In Eight Days, 13 Corona, 39 Of What?

या मृत्यूंच्या ऑडिटचे काय?:खासगी डॉक्टरांचा हलगर्जीपणा, अर्ध्या गावाला बाधा; आठ दिवसांत 52 मृत्यू, 13 कोरोनाचे, 39 कशाचे?

गणेश सुरसे|मंदार जोशी गोवर्धन (जि. वाशिम), मनोज व्हटकर| मंगेश फल्ले म्हसवड (जि. सातारा)4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांगल्या उपचारांसाठी ग्रामस्थांचा 25 किमीचा प्रवास - Divya Marathi
चांगल्या उपचारांसाठी ग्रामस्थांचा 25 किमीचा प्रवास
  • गंभीर रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी करावा लागतो 40-80 किमीचा प्रवास

पंधरा दिवसांपूर्वी गोवर्धनमध्ये दररोज पाच-सहा जणांचे मृत्यू होत होते. सरण रचायला जागा नव्हती. तेव्हा प्रशासन जागं झालं आणि गावात पोहोचलं, तोपर्यंत मृतांचा आकडा ५२ च्या घरात गेला होता. त्यापैकी १३ जणांची चाचणी झाल्याने कोरोनामुळे दगावलेल्यांची नोंद “१३’ अशी झाली. पण उरलेले “३९’ कशामुळे दगावले याचे उत्तर ना प्रशासनाकडे आहे ना गावकारभाऱ्यांकडे. हा संसर्ग वाढवण्यात हातभार लावणाऱ्या दोन खासगी डॉक्टरांवर तहसीलदारांनी कडक कारवाई केली आहे.

“दिव्य मराठी’ची टीम येथे पोहोचली तेव्हा कळले, अख्ख्या तालुक्यासाठी एकही कोविड सेंटर नाही. आ. अमित झनकांच्या गावापासून ५ किमीवरील गोवर्धनमध्ये मृत्यूचे तांडव सुरू होते. ४० वर्षांपासून या मतदारसंघाची धुरा झनक कुटुंबाकडे आहे. पण तालुक्यात आरोग्य व्यवस्थेची बोंब आहे. सवडचे आयसोलेशन सेंटर आणि रिसोडचे ५० खाटांचे खासगी कोविड सेंटर एवढाच आधार.

चौकशीनंतर दवाखाना सील
शहरातून बरेच जण गावात परतले. त्यातले अनेक लोक आजारी पडले. त्यांनी गावातीलच दोन छोट्या दवाखान्यांत उपचार घेतले. या दोन्ही डॉक्टरांनी त्यांना कोरोना चाचणी सांगितली नाही. त्यामुळे आजार वाढला . आम्ही ते दोन्ही दवाखाने सील केले आहेत. - अजित शेलार, तहसीलदार

महाराष्ट्रातील दुर्गम भागात गंभीर रुग्णांना दूरवरील रुग्णालयांतच हलवले जाते. मृतांच्या आकड्यातही गोंधळ आहे. काही ठिकाणी चाचणीशिवाय दगावलेले तिप्पट आहेत. काही गावातच तर काही वाटेत दगावले आहेत.

दोन दिवसांत घरात दोन मृत्यू झाले
गोवर्धनमध्ये किराणा दुकान व्यावसायिक संतोष तुकाराम डांगे ४९ आणि त्यांची आई कांताबाई यांची प्रकृती ८ एप्रिल रोजी अचानक बिघडली. त्यांना ९ एप्रिल रोजी २६ किलोमीटरवरील खासगी रुग्णालयात नेले. १२ रोजी संतोषचा तर १३ रोजी कांताबाईचा मृत्यू झाला. छोटा मुलगा गणेश म्हणाला की, गावात लवकर कोरोना चाचणी झाली असती तर कुटुंबाला हा दिवस बघावा लागला नसता.

८० वर्षीय आजीबाईंनी मुलगा गमावला
गावातल्या एका छोट्या गल्लीत राऊत कुटुंब राहते. पहिल्या खोलीत वयाची ८० गाठलेल्या आजी बसल्या होत्या. घरातील कर्ता पुरुष गजानन राऊत (५२) यांचा काही दिवसांपूर्वीच कोरोनामुळे मृत्यू झाला. मुलगा दहावीत आहे. दिव्य मराठी टीमने धाडस करत त्यांना प्रश्न विचारण्याची हिंमत केली. मात्र आजीबाई काहीच बोलल्या नाहीत. त्यांच्या डोळ्यांतील अश्रू बरंच काही बोलून गेले.

एप्रिल-मेमध्ये 15 जणांचा मृत्यू, लसीकरण फक्त 30 %
एप्रिल-मेमध्ये 15 जणांचा मृत्यू, लसीकरण फक्त 30 %

गंभीर रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी करावा लागतो 40-80 किमीचा प्रवास

सातारा तालुक्यातील शेवटचे गाव म्हसवड. येथे सध्या कोरोनाचे १८९ रुग्ण आहेत. वर्षभरात १७४५ जणांना बाधा झाली. ४० जणांना मृत्यूने गाठले. या वर्षी एप्रिलमध्ये १५ जणांचा बळी गेला. या मृत्यूंसाठी कोरोनासोबत प्रशासनही तेवढेच कारणीभूत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुठल्याही अद्ययावत सुविधा नाहीत. गावातील दोन खासगी दवाखान्यांत दोनच व्हेंटिलेटर आहेत. गंभीर रुग्णाला ४० ते ८० किमीवरील रुग्णालयांत हलवावे लागते. या प्रवासात रुग्णांना साथ असते ती केवळ नशिबाची.

म्हसवडमध्ये एप्रिलमध्ये ६३२ आणि मे महिन्यात २८१ रुग्ण बाधित झाले आहेत. या दोन महिन्यांत १५ जणांचा मृत्यू झाला. रोज शंभर जणांची चाचणी केली जाते. केवळ सतराशे लोकांचे लसीकरण (३० टक्के) झाले आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १७ कर्मचारी असून त्यातील दहा जणांना कोरोनाची बाधा झाली होती.

गंभीर रुग्ण ‘रामभरोसे’
म्हसवडमधील गंभीर रुग्णांना मायणी मेडिकल कॉलेजमध्ये ४० किलोमीटर अंतरावर न्यावे लागते, तर सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटल ८० किलोमीटरवर आहे. या दूरच्या प्रवासात रुग्णाचा जीव ‘रामभरोसे’ असतो.

दहापैकी सात बाधित
सामाजिक कार्यकर्ते संजय भागवत यांनी सांगितले की, तपासण्या वाढल्या की, बाधितही वाढतात. १० पैकी ७ जण बाधित होत आहेत. आमच्या १५ जणांच्या कुटुंबातील १२ जण बाधित निघाले होते.

सुविधा वाढवण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर

म्हसवडच्या आरोग्य केंद्राच्या विस्ताराची गरज आहे. डॉक्टर व कर्मचारीही वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. रेमडेसिविर जसे उपलब्ध होते तसे दिले जात आहे. गावातील खासगी हॉस्पिटलमध्ये केवळ दोन व्हेंटिलेटर बेड आहेत. - डॉ. कोडलकर, आरोग्य अधिकारी

बातम्या आणखी आहेत...