आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आरक्षण पेच:भाजपसह सर्वपक्षीय नेत्यांसमवेत मुख्यमंत्री ठाकरे यांची बैठक; मराठा विद्यार्थी, तरुणांना दिलासा देण्यासाठी आराखडा बनवणार!

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • घटनापीठासमोर बाजू मांडणार, वकिलांची टीम बदलणार नाही
  • घटनापीठाकडे सर्व तयारीनिशी जाऊ : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर बुधवारी विरोधकांशी मराठा आरक्षणावर चर्चा केली. दोन ते तीन दिवसांत यावर निर्णय जाहीर करणार असल्याचे उद्धव यांनी बैठकीनंतर सांगितले. त्याचबरोबर मराठा विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी आराखडा बनवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आरक्षणप्रकरणी घटनापीठासमोर सर्व तयारीनिशी राज्य सरकारची भूमिका मांडण्याबाबत सहमती झाल्याचे दिसून आले.

दोन्ही सभागृहांच्या विरोधी नेत्यांशी मराठा आरक्षणप्रश्नी चर्चा केली. मागच्या आठवड्यात याचिका करणारे आणि त्यांच्या वकिलांशी चर्चा झाली. जी समिती नेमली आहे ती विविध तज्ज्ञांसोबत चर्चा करत आहे. आम्ही एक मार्ग, एक दिशा ठरवण्याच्या दिशेने आलो आहोत. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आम्ही याप्रश्नी सरकारसोबत आहोत हे वचन दिले आहे. आरक्षण देण्यासाठी सर्वजण आजही वचनबद्ध आहोत, असे ते म्हणाले.

> अध्यादेश काढणे, फेरविचार याचिका दाखल करणे आणि घटनापीठाकडे जाणे असे तीन पर्याय आहेत. पहिले दोन पर्याय शासनाला योग्य वाटत नाहीत. तिसरा पर्याय योग्य वाटतो आहे. आम्हा विरोधकांचे तेच मत आहे. सोमवार, मंगळवारपर्यंत त्याचा मसुदा तयार करून तो मुख्य न्यायमूर्तींकडे पाठवला जाईल. घटनापीठाकडे सर्व तयारीनिशी जाऊ, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

> शैक्षणिक प्रवेशाच्या जागा वाढवल्या तर मराठा विद्यार्थ्यांना यंदा संधी व न्याय मिळेल. या जागांवरील विद्यार्थ्यांच्या शुल्काची सरकारने प्रतिपूर्ती करावी, अशी सूचना भाजपने बैठकीत केली होती. त्यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत मराठा समजातील तरुण-तरुणींना काय दिलासा द्यायचा यावर चर्चा झाली.

> विरोधी पक्षातील नेत्यांनी अनेक सूचना केल्या आहेत. यापूर्वी तज्ञ आणि या क्षेत्रातील मंडळींनी सूचना केल्या आहेत. या सगळ्या सूचना एकत्र करून उद्या किंवा परवा (शुक्रवारी) निर्णय जाहीर करू. सर्व सूचना एकत्र करून, कायदेतज्ञांशी चर्चा करून सरकार पुढील पाऊल टाकेल असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

> आमच्या आधीच्या सरकारने जी वकिलांची टीम दिली होती त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे त्यांनी सांगितले. पुन्हा एकदा आंदोलन न करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले तसेच लढाई जिंकण्यासाठी जे काही करावे लागेल ते सगळे करू, असा निर्धारही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला.

शैक्षणिक प्रवेशाच्या जागा वाढवाव्यात

आंदोलने करू नयेत, महाराष्ट्र शांत कसा राहील याचे भान ठेवावे. शैक्षणिक प्रवेशाच्या जागा वाढवल्या तर मराठा विद्यार्थ्यांना यंदा संधी व न्याय मिळेल. या जागांवरील विद्यार्थ्यांच्या शुल्काची सरकारने प्रतिपूर्ती करावी, सारथी संस्थेच्या मार्गे मराठा विद्यार्थ्यांना उद्योगांमध्ये मदत करता येऊ शकते तसेच अण्णासाहेब पाटील माथाडी मंडळाला मदत करावी, अशा सूचना केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

कोल्हापुरात आज आंदोलन, दूधपुरवठा रोखणार :

आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज आक्रमक झाला असून गुरुवारपासून मुंबई-पुणे येथे होणारा दूधपुरवठा बंद आंदोलन करणार आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाचे दिलीप पाटील, सचिन तोडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. गुरुवारी सकाळी ८ वाजता गोकुळ शिरगाव येथे आंदोलन सुरू होणार आहे.

सर्वपक्षीय नेत्यांची बैठकीस हजेरी :

बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, जलसंपदामंत्री जयंत पाटील, परिवहनमंत्री अनिल परब, जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू, शेकापचे आमदार जयंत पाटील, शिवसंग्राम पक्षाचे आमदार विनायक मेटे, लोकभारती पक्षाचे आमदार कपिल पाटील उपस्थित होते. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर दूरदृश्य माध्यमातून सहभागी झाले.