आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:सरकारवर संघर्षाची वेळ आणू नका: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

“राज्य सरकारची अडवणूक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही तुमच्यासारखी आडमुठी भूमिका घेत नाही. संघर्ष करण्याची वेळ आमच्यावर आणू नका,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला.

मुंबईतील मेट्रोच्या दोन मार्गांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आजारपणानंतर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले. सकाळी चर्नी रोड येथील मराठी भाषा भवनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर सायंकाळी त्यांनी मेट्रो प्रकल्पांचे उद्घाटन केले. या वेळी त्यांनी केंद्र सरकारच्या बुलेट ट्रेन प्रकल्पावर जोरदार टीका केली. “आमच्याकडे बुलेट ट्रेनसाठी आग्रह करण्यात आला. आर्थिक केंद्रासाठीची मोक्याची जागा त्यांनी बुलेट ट्रेनसाठी घेतली. मुंबईवर प्रेम आहे तर कांजूरची ओसाड जमीन का देत नाही? मुंबईच्या पंपिंगसाठी जागा देत नाही. धारावीसाठी जागा देत नाही. अडलेले अनेक प्रकल्प आहेत ते मार्गी का लागत नाहीत?’असा सवाल करतानाच “बुलेट ट्रेन करायचीच होती तर अहमदाबाद ते मुंबई का? नागपूर ते मुंबई अशी का नाही?’ असा सवाल त्यांनी केला. भाजपकडून सुरू असलेल्या आरोपांवर बोलताना ते म्हणाले, “राजकारणात कोरोनानंतर एक साथ आली आहे. या रोगाचं आणि व्हायरसचं निदान झालं नाही. म्हणजे एक तर तुम्ही काही केलं नाही, केलं तर ते आम्हीच केलं. त्यातून नवीन काही केलं तर त्यात भ्रष्टाचार केला आहे. ही अशी नवीन साथ आली आहे. एक जाहिरात आहे. त्यानुसार मळमळतंय कळमळतंय लक्षणे एकत्रच सुरू होतात. डॉक्टरला प्रश्न पडतो काय करायचं? अशा रुग्णांकडे पाहण्याची गरज नाही,’ असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी भाजपवर नाव न घेता चढवला.

दुकानांवर मराठी पाट्या ला‌वण्याचा कायदा करावा लागतो हे दुर्दैव : चर्नी रोड येथील मराठी भाषा भवनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी मातृभाषेचा न्यूनगंड असता कामा नये, असे सांगून या राज्यात दुकानांवर मराठी पाट्या असाव्यात हा कायदा करावा लागतो, ही वेळ का आली, ही विचार करण्याची गोष्ट आहे. जास्तीत जास्त भाषा शिकणे गुन्हा नाही, पण आपल्या मातृभाषेचा न्यूनगंड कधीही वाटता कामा नये, असे मुख्यमंत्री म्हणाले. रोजच्या वापरातील प्रशासकीय मराठी भाषाही सोपी असावी, असा आग्रह मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.

कर्नाटकातील मराठी भाषकांवरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाही : “इतर भाषांचा द्वेष नको, पण त्यांचे आक्रमणही नको. कर्नाटकात मराठी भाषकांवरचे अत्याचार सहन करायचे नाहीत. त्यांच्यावरील भाषिक अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत, सहन करणार नाही,’ असा इशाराही त्यांनी या वेळी कर्नाटक सरकारला दिला.

... तर मशिदींसमोर भोंगे लावून दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावणार

मुंबई मशिदींवरील लाऊडस्पीकर खाली उतरवावेच लागतील, अन्यथा ज्या मशिदीवर हे भोंगे लागतील त्या मशिदीसमोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी दिला. मुंबईत झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात ते बोलत होते. राज ठाकरे यांनी अपेक्षेनुसार शिवसेनेवर जोरदार टीका केली.ते म्हणाले की, राज्यातील जनतेने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्यासाठी शिवसेनेला मते दिली नव्हती. मग मतदारांशी गद्दारी करणाऱ्या राजकीय पक्षांना कोणती शिक्षा देणार? विधानसभा निवडणुकीआधी भाजप-शिवसेना विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस असे चित्र राज्यात होते. पण निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजप व शिवसेनेने अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून घ्यावे, अशी टूम काढली. याबाबत अमित शहा यांच्याशी आपले बोलणे झाल्याचे उद्धव यांनी सांगितले. मग त्यांनी ही गोष्ट कधीच जाहीरपणे का सांगितली नाही? निवडणुकीच्या प्रचारात उद्धव हे नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यासपीठावर होते.

राज्यात युतीचे सरकार आल्यास भाजपचाच मुख्यमंत्री होईल, असे मोदी सांगत होते. मग तेव्हा उद्धव यांनी कोणताही आक्षेप का घेतला नाही, असा प्रश्न राज यांनी विचारला. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीयवाद फोफावला, अशा शब्दांत राज यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली. आमदारांना मुंबईत घरे देण्याच्या निर्णयावरही टीका करताना राज म्हणाले, आमच्या आमदाराने सर्वात आधी या निर्णयाला विरोध केला. आमदार लोकांसाठी काम करतात, ते काही उपकार करत नाहीत, असे म्हणत त्यांनी आमदारांच्या पेन्शनलाही विरोध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडीचे छापे टाकण्याऐवजी झोपडपट्ट्यांमधील मदरशांवर धाडी टाकाव्यात, तेथे अनेक गोष्टी हाती लागतील, असा सूचक उल्लेखही त्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...