आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंनतात विलीन:डॉ. गेल यांनी दिले सामान्यांच्या लढ्याला विचारांचे बळ; सर्वहारांच्या तारणहार अन् अभ्यासकांच्या एन्सायक्लोपीडिया डॉ. गेल ऑम्वेट यांचे निधन

सातारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्राची पाटणकर ही आई डॉ. गेल ऑम्वेट यांना अग्नी देताना

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या व धोरण समितीच्या सदस्या, बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्या व स्त्रीमुक्तिवादी विचारांची, संत साहित्याची आणि वारकरी तत्त्वज्ञानाची अभ्यासपूर्ण अशी नव्या पद्धतीची मांडणी करून समाजापुढे आणणाऱ्या ज्येष्ठ संशोधक-लेखिका गेल ऑम्वेट (८१) ऊर्फ शलाका भारत पाटणकर यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी सकाळी १० वाजता कासेगाव (जि. सांगली) येथे बाबूजी पाटणकर संस्थेच्या आवारामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यांची मुलगी प्राची पाटणकर यांनी आई डॉ. गेल ऑम्वेट यांना अग्नी दिला आहे.

सामान्यांच्या लढ्याला विचारांचे बळ देणाऱ्या आणि आपल्या भूमिकेवर ठाम राहून उपेक्षित, वंचितांसाठी लढा देणाऱ्या डॉ. गेल ऑम्वेट यांचे एकूणच सामाजिक, वैचारिक योगदान मोठे आहे. इथल्या मातीशी, मनांशी अन् संस्कृतीशी एकरूप होऊन सर्वहारांच्या उत्थानासाठी ध्येयवादाची वेगळी वाट त्यांनी मळली... श्रमिक मुक्ती दलाचे (लोकशाहीवादी) प्रमुख संघटक, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्याध्यक्ष आणि डॉ. गेल यांच्यासोबत विविध चळवळींमध्ये अनेक वर्षे सहभागी राहिलेले कॉ. धनाजी गुरव यांनी केलेले त्यांच्या कार्याचे स्मरण त्यांच्याच शब्दांत...

डॉ. गेल ऑम्वेट यांच्या निधनानंतर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू मनाभोवती फेर धरत आहेत. वैचारिक कणखरपणा आणि भूमिकेतील ठामपणा हे त्यातील ठळकपणे समोर येणारे पैलू. परित्यक्ता - विधवा स्त्रियांच्या चळवळी, कष्टकरी, शेतकरी- शेतमजुरांच्या चळवळी, ईशान्य भारतातील आदिवासींचे लढे, दक्षिणेतील दलितांच्या चळवळी, जातीअंताच्या चळवळी यांच्याशी त्यांनी जोडलेले जिवंतपणाचे नाते अशा अनेक गोष्टी कायम स्मरणात राहतील. डॉ. गेल यांच्या विचार आणि व्यवहारांत कोणतेही अंतर नव्हते. त्यांनी काही वर्षांपूर्वी शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेला राजकीय पाठिंबा जाहीर केला होता. त्याच वेळी त्यांचे सहचारी असलेले डॉ. भारत पाटणकर डाव्या चळवळीचे नेतृत्व करत होते व एका संघटनेचे नेते होते. शरद जोशींंच्या शेतकरी संघटनेशी त्यांचे विचार जुळत नव्हते. तरीही डॉ. गेल यांनी मात्र शेतकरी संघटनेला पाठिंबा कायम ठेवून आपण जो विचार मांडला, तसाच व्यवहार करत आलो आहोत, असा संदेश दिला.

जगाच्या दृष्टीने भारतातील सर्व चळवळींचा एन्सायक्लोपीडिया म्हणून डॉ. गेल ओळखल्या जात. महात्मा फुले यांच्या विचारांची चळवळ, वारकऱ्यांची चळवळीशी त्यांचे जवळिकीचे नाते होते. डाव्या चळवळीला तथागत गौतम बुद्ध, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांकडे नेण्यात डॉ. गेल यांचा मोठा वाटा राहिला. प्रतिसरकारच्या चळवळीत सहभागी झालेल्यांचे जातवर्गीय स्वरूप तसेच स्त्री-पुरूष प्रमाण यांचे अत्यंत चांगले विश्लेषण डॉ. गेल यांनी केले आहे. या चळवळीत सहभागी झालेल्यांमध्ये दलित किती? ब्राह्मण किती? स्त्रिया किती? या टक्केवारीसह त्यांनी तयार केलेला तपशील अत्यंत प्रभावी आणि उपयुक्त ठरला. “बुद्धिझम इन २०००’ या ग्रंथामध्ये त्यांनी फुले- शाहू- आंबेडकरवादी आणि डाव्या चळवळीचा मागोवा घेतला आहे. डाव्या चळवळीसाठी हे पुस्तक दिशादर्शक ठरले.

विचारवंत आणि संत साहित्याच्या गाढ्या अभ्यासक एलिनॉर झेलिएट या डॉ. गेल यांच्या पीएच. डी. प्रबंधाच्या मार्गदर्शक होत्या. तोच विचारांचा धागा घेऊन डॉ. गेल महात्मा फुले यांच्या विचारांच्या चळवळीबरोबरच वारकऱ्यांच्या चळवळीशीही जोडल्या गेल्या होत्या. डॉ. गेल यांनी मात्र आपलं अवघं आयुष्य महाराष्ट्रासाठी दिलं. मात्र, या द्रष्ट्या विदुषीला महाराष्ट्राने काय दिलं, हा प्रश्न साहजिकच मनात उभा राहतो. सामान्यांच्या लढ्याला विचारांचे बळ देणाऱ्या आणि आपल्या भूमिकेवर ठाम राहून उपेक्षित, वंचितांसाठी लढा देणाऱ्या डॉ. गेल यांचे एकूणच सामाजिक, वैचारिक योगदान मोठे आहे. इथल्या मातीशी, मनांशी अन् संस्कृतीशी एकरुप होऊन सर्वहारांच्या उत्थानासाठी ध्येयवादाची वेगळी वाट त्यांनी मळली. ही वाट अधिक रुंदावत, विस्तारत पुढे जाणे हेच डॉ. गेल यांना अभिवादन ठरेल.

बातम्या आणखी आहेत...