आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड:थायलंडच्या धर्तीवर अर्धापूर तालुक्यातील लहान येथे फुलवला ‘ड्रॅगन फ्रूट’चा मळा!

नांदेड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लहान येथे दोन एकरवर निवृत्त अधिकाऱ्याने केली लागवड; वर्षाकाठी ४ लाखांपर्यंत मिळते उत्पन्न

थायलंडच्या धर्तीवर नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील लहान येथे सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तमराव इंगळे यांनी दोन एकरवर ‘ड्रॅगन फ्रूट’चा मळा फुलवला आहे. यातून त्यांना वर्षाकाठी जवळपास ४ लाख उत्पन्न मिळते. पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देऊन निवडलेली वेगळी वाट इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

‘ड्रॅगन फ्रूट’ची शेती ही प्रामुख्याने थायलंडमध्ये केली जाते, तर महाराष्ट्रात सोलापूर, सांगली, सातारा आणि पुणे व आता नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर व हिमायतनगरमध्ये याची लागवड केली जात आहे. डॉ. उत्तमराव इंगळे हे २०१८ मध्ये सेवानिवृत्त झाले असून त्यांचा मुलगा मेजर विक्रम इंगळे यांची ‘ड्रॅगन फ्रूट’ची शेती करण्याची इच्छा होती. मेजर विक्रम यांच्या बारामती येथील वर्गमित्राकडे ‘ड्रॅगन फ्रूट’ची शेती असून त्यांच्याकडूनच त्यांना प्रेरणा मिळाली, असे डॉ. इंगळे यांनी सांगितले.

लहान येथे इंगळे यांची १८ एकर शेती असून त्यापैकी २ एकरमध्ये ‘ड्रॅगन फ्रूट’ची लागवड केली. या पिकाची लागवड वेल स्वरूपाची असल्याने शेतात सिमेंटचे खांब उभे करून रोपांची लागवड केली. निवडुंग परिवारातील हे फळ आहे. दोन एकमध्ये १२०० खांबांना ४८०० झाडे लावण्यात आली. सुरुवातीला अडीच ते ३ लाख रुपये लागवडीसाठी खर्च येतो. लागवडीनंतर एका वर्षाला फळधारणा सुरू होते. एकदा लागवड केल्यानंतर १५ वर्षे ही झाडे टिकतात. त्यानंतर पुन्हा खर्च लागत नाही. जुलै ते नोव्हेंबरदरम्यान फळे येतात. गतवर्षी पाच क्विंटल, तर यंदा तीन ते चार टन उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे. सध्या नांदेड जिल्ह्यातच सोशल मीडियाच्या माध्यमातून याची विक्री करण्यात येत आहे. हे फळ रोगप्रतिकारकशक्ती वाढवते. पांढऱ्या पेशींची वाढ करते. त्यामुळे मागणी अधिक आहे, असे डॉ. इंगळे यांनी सांगितले.

पिकाला शासनाची मान्यता
रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होत नाही. पाणी कमी लागते. अतिवृष्टी, वादळाचा काहीच परिणाम होत नाही. तसेच जनावरेही त्याला खात नाही. याशिवाय महाराष्ट्र शासनाने या पिकाला मान्यता दिली असून त्याचे नाव ‘कमलम’ असे ठेवण्यात आले आहे. त्याला अनुदान दिले जाणार आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळावे. - डॉ. उत्तमराव इंगळे, सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी

बातम्या आणखी आहेत...