आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना परिस्थिती:कोरोनापूर्वीच्या तुलनेत राज्यात सीटी स्कॅनच्या चाचण्यांत आठपटीने वाढ, 25 जिल्ह्यांत पाहणी; कोरोनाचे नेमके निदान, उपचाराची दिशा ठरवण्यात उपयुक्त

औरंगाबाद, नाशिक, जळगाव, सोलापूर, अकोला, नगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात कोरोनाचा मुक्काम वर्षभरापासून आहे. या काळात आरटीपीसीआर, रॅपिड अँटिजन चाचण्यांसोबतच सीटी स्कॅन किंवा एचआरसीटी चाचण्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. कोरोना पूर्वीच्या तुलनेत राज्यात सीटी स्कॅन चाचण्यांच्या प्रमाणात आठ ते १० पटीने वाढ झाल्याचे चित्र आहे. राज्यातील वेगवेगळ्या शहरांत सीटी स्कॅन चाचण्याचे वेगवेगळे दर आहेत. दिव्य मराठीने २६ जिल्ह्यांत केलेल्या पाहणीत या चाचणीचे सर्वाधिक दर जालना ५५०० रुपये तर सर्वात कमी १२०० रुपये दर वर्धा येथे असल्याचे आढळले.

आरटीपीसीआर तसेच अँटिजन चाचण्या असताना कोरोनासाठी सीटी स्कॅनचा आग्रह का? याबाबत विचारले असता, औरंगाबाद येथील रेडिओलॉजी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शरद कोंडेकर यांनी सांगितले, अनेकदा अँटिजन आणि आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह येते. मात्र, सीटी स्कॅन चाचणी केल्यानंतर कोरोना आहे किंवा नाही, प्रमाण किती आहे हे नेमकेपणाने सांगता येते. कोरोनापूर्वी ही चाचणी क्षयरोग, कर्करोग, छातीच्या इतर आजारांसाठी व्हायच्या. आता कोरोनासाठी होत आहेत. पूर्वी दिवसाकाठी ८ ते १० चाचण्या व्हायच्या. आता याचे प्रमाण दिवसाला ८० ते १०० पर्यंत आहे.

पुणे येथील भारती हॉस्पिटलमध्ये कोरोनापूर्वी दिवसाला १० ते १५ सिटी स्कॅन होत, आता हे प्रमाण ५० ते ७० आहे. अकोला येथेही पूर्वी १० ते १५ सीटी स्कॅन होत, आता हे प्रमाण ८० ते ९० आहे. अमरावतीत हे प्रमाण पूर्वीपेक्षा पाच ते सहा पटीने वाढले आहे.

विविध जिल्ह्यांतील सीटी स्कॅनचे खासगीतील दर असे
औरंगाबाद ,नागपूर, चंद्रपूर,नंदूरबार: २००० ते ३००० रुपये. गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, बुलडाणा : १५०० ते २५०० रु. हिंगोली : १५०० रुपये. वर्धा : १२०० ते ३६०० रुपये. सोलापूर, नांदेड, बीड, नाशिक, भंडारा, वाशिम : २५०० रु. अकोला : २००० रु. यवतमाळ : १५०० ते २५०० रु. अमरावती : २००० ते ४००० रुपये, जळगाव : २००० ते ३५०० रु. पुणे : ३००० ते ४००० रु., परभणी : ४००० रु.,उस्मानाबाद : २५०० ते २८०० रु., जालना : २५०० ते ५५०० रुपये, नगर : १५०० ते ३००० रुपये. शासकीय रुग्णालयात जिल्हानिहाय २५० ते ४०० रुपये दर आहे. बीपीएल, कोरोना रुग्णांसाठी मोफत चाचणी केली जाते.

चाचणीबाबत शंका असल्यास सीटी स्कॅन अत्यंत उपयुक्त
चाचण्या निगेटिव्ह आल्या तरीही शंका असेल तर सीटी स्कॅन चाचणी कोरोनाची खात्री करून देते. ही चाचणी रुग्णाला लुटणारी नसून नेमक्या उपचाराच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. नेहमीच्या सर्दीचे फुफ्फुसात इन्फेक्शन होत नाही. कोरोनामध्ये फुफ्फुसामध्ये आजार किती प्रमाणात पसरला आहे ते कळते. - डॉ. डी. बी. दहिफळे, संचालक, सह्याद्री डायग्नोस्टिक सेंटर, औरंगाबाद

सीटी स्कॅनमुळे इन्फेक्शनची नेमकी स्थिती कळते
कोरोना रुग्णांची एचआरसीटी ही चाचणी केली तर लागण नेमकी किती आहे हे तर कळतेच, शिवाय त्या रुग्णाला रुग्णालयात उपचार करावेत किंवा घरीच उपचार करावेत हे समजते. ऑक्सिजन द्यावा लागेल किंवा नाही हे ठरवणे सोपे होते. इन्फेक्शनच्या पातळीनुसार किती क्षमतेची औषधी द्यावी हा निर्णय घेता येतो. रुग्णासाठी हे फायद्याचे आहे. - डॉ. आनंद देशमुख, एमडी मेडिसिन मेडिकोव्हर रुग्णालय, औरंगाबाद

उपचारांची दिशा ठरते
घाटीत सीटी स्कॅन चाचणी ही निदान करण्यासाठी नाही तर आमच्याकडे दाखल रुग्णांच्या उपचारात काय बदल करावेत हे ठरवण्यासाठी केली जाते. - डॉ. वर्षा रोटे, रेडिओलॉजी विभागप्रमुख, शासकीय रुग्णालय-घाटी, औरंगाबाद

बातम्या आणखी आहेत...