आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूरांना आपण विसरलो!:नांदेडचा राष्ट्रीय ‘बाल शौर्य’ विजेता एजाज वाहनात भरतोय केळींचे घड, नदीत बुडणाऱ्या दोन मुलींचे वाचवले होते प्राण

नांदेड / शरद काटकर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्धापूर येथे केळीचे घड वाहनात भरण्याचे काम करताना एजाज नदाफ. - Divya Marathi
अर्धापूर येथे केळीचे घड वाहनात भरण्याचे काम करताना एजाज नदाफ.

स्वत:च्या जिवाची पर्वा न करता नदीत बुडत असलेल्या दोन मुलींचे प्राण वाचवणाऱ्या नांदेडच्या एजाज अब्दुल रऊफ नदाफला केंद्र सरकारने २०१८ मध्ये राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने गौरवले. तेव्हा त्याच्यावर मदतीच्या घोषणांचा पाऊस झाला. प्रत्यक्षात आज तो केळींचे घड वाहनात भरण्याचे हमाली काम करतोय.

वडिलांनी एजाजला अकरावी शिक्षणासाठी नांदेडच्या नामांकित कॉलेजच्या विज्ञान शाखेत प्रवेश करवून दिला. सुरुवातीला केंद्राकडून महाविद्यालयात २० ते ३० हजार रुपये शुल्क जमा झाले. त्यानंतर बारावीला प्रवेशाच्या वेळी मात्र पुन्हा मदत मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. इतका खर्च शक्य नसल्याने त्याने प्रवेश रद्द करून गावाजवळ डोंगरकडा येथील कॉलेजच्या कला शाखेत प्रवेश घेतला. परीक्षा शुल्क भरण्यासाठीही पैसे नसल्याने एक वर्ष वाया गेले. २०२१ मध्ये ८२ टक्के गुणांसह एजाज बारावी उत्तीर्ण झाला. पण परिस्थितीमुळे तो पुढील शिक्षण घेऊ शकत नाही. सध्या तो अर्धापूरमध्ये केळीचे घड वाहनात भरण्याचे काम करत आहे. एजाजसह आई, वडील व एक भाऊ, बहीण असा त्याचा परिवार आहे. तो घरात सर्वात लहान आहे.

नवी दिल्ली | २०१८ मध्ये येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार स्वीकारताना एजाज नदाफ.
नवी दिल्ली | २०१८ मध्ये येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार स्वीकारताना एजाज नदाफ.

परवड : पुरस्काराच्या वेळी एजाजच्या शिक्षणाचा खर्च केंद्राकडून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच जिल्हा परिषद बैठकीतही एजाजच्या कुटुंबाला घरकुलाचा लाभ देण्याचे आश्वासनही दिले. ते हवेतच विरले.

पुरस्कार : अर्धापूर तालुक्यातील पार्डी हे एजाजचे मूळ गाव. तो नववीत असताना ३० एप्रिल २०१७ रोजी त्याने नदीत बुडणाऱ्या दोन मुलींचे प्राण वाचवले. २०१८ मध्ये दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते एजाजला पुरस्कार मिळाला.

सरकारने नोकरी द्यावी
मुलींना वाचवल्यानंतर खूप जणांनी मदत करतो म्हटले होते. पण कुणी काहीच केले नाही. बिकट परिस्थितीत बारावी उत्तीर्ण झालो. आता सरकारने नोकरी द्यावी एवढीच अपेक्षा आहे. - एजाज अब्दुल रऊफ नदाफ, अर्धापूर, जि.नांदेड.

बातम्या आणखी आहेत...