आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकनाथ खडसेंचे सीमोल्लंघन:कालच फडणवीस म्हणाले होते खडसेंच्या राजीनाम्याचा रोज नवीन मुहूर्त बनतो! खडसेंच्या भाजप सोडण्याची ही आहेत कारणे...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2016 मध्ये खडसेंवर झाला होता भ्रष्टाचाराचा आरोप, यामुळे 2019 निवडणुकीसाठी तिकीटही कापले

एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याचा मुहूर्त आज लागला असला तरीही त्याची चर्चा 2016 पासून सुरू होती. 2016 मध्ये पुण्याच्या भोसरी येथील एमआयडीसीच्या जमीन घोटाळ्यावरून खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. भोसरी एमआयडीसीमधील 31 कोटींची हा भूखंड अवघ्या पावणेचार कोटींना खडसे कुटुंबियांना विकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. नंतर मात्र खडसे यांना याप्रकरणी क्लीनचीट देण्यात आली होती.

विधानसभेला खडसेंचे तिकीट नाकारले, मात्र कन्येला दिले

या घोटाळ्यानंतर 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून खडसेंना तिकीट नाकारण्यात आले. मात्र आमदारकीसाठी त्यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर हिला भाजपने तिकीट दिले. यानंतर एकनाथ खडसे म्हणाले होते की, मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार होतो म्हणून मला फडणवीसांनी टार्गेट केले. घोटाळा मी केला नाही. माझ्या नातेवाइकांनी काही केले असेल तर मला का दोषी धरता असा सवाल खडसेंनी विचारला होता.

विधानसभेनंतर विधान परिषदेचीही उमेदवारी नाकारली

2019 विधानसभेत उमेदवारी नाकारल्यानंतर 8 मे 2020 विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी एकनाथ खडसे उत्सुक होते, त्यांना उमेदवारी देण्यात यावी म्हणून त्यांनी भाजपा कडे उमेदवारीची मागणी केली होती परंतु त्यांना यावेळीही उमेदवारी दिली गेली नाही. म्हणून त्यांनी वृत्तवाहिन्यांवर नाराजी व्यक्त केली होती.

फडणवीसांकडून राजकीय कारकीर्द संपवण्याचा कट रचला गेला

एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जामनेरचे आमदार व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या वर आरोप केले. गिरीश महाजन व देवेंद्र फडणवीस यांच्या मुळेच आपले तिकीट कापले गेल्याचा खळबळ जनक आरोप त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना केला होता. आपली राजकीय कारकीर्द संपवण्याचा कट रचला गेला असाही आरोप त्यांनी केला. मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार होतो म्हणून मला फडणवीसांनी टार्गेट केले. जनाधार असलेल्या नेत्यांना तिकीट नाकारले व दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना तिकीट दिले गेले त्यामुळेच 2019 विधानसभेत अपयश आले असे ते म्हणाले. खडसे यांनी आरोप केला की कोअर कमिटी च्या बैठकीत देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी आपल्या बद्दल नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आपल्याला तिकीट दिले नसल्याचे खडसे म्हणाले होते.

... आणि आज खडसेंनी राजीनामा दिला

भाजप आपली दखल घेत नसल्याचे खडसेंच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वेळोवेळी राजीनामा देण्याचे संकेत दिले. मात्र त्यावेळीही भाजपने खडसेंना थांबवण्यासाठी काहीच केले नाही. खडसे पक्ष सोडणार नाहीत असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर खडसे यांच्या राजीनाम्याचा रोज मुहूर्त तयार होतो, मी यावर काही बोलणार नाही असे फडणवीस कालच म्हणाले होते. आणि आज एकनाथ खडसेंनी भाजपचा राजीनामा दिला.

बातम्या आणखी आहेत...