आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खडसेंचे टीकास्त्र:'बहुजन मुख्यमंत्री झाला पाहिजे म्हटल्यामुळे माझ्या मागे चौकशा लावल्या, आता यांना टेंशन देणार'-एकनाथ खडसे

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'ज्या ठिकाणी माझे बळ, त्या ठिकाणी स्वतंत्र गट स्थापन करणार'

भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांनी परत एकदा देवेंद्र फडणवीसांवर निशाना साधला आहे. 'माझ्या डोक्यावरील टेंशन कमी झालं, आता इतरांना टेंशन देणार', असा इशारा खडसेंनी दिला. ते नाशिकमध्ये बोलत होते.

यावेळी खडसे म्हणाले की, 'भाजपमध्ये असताना चार वर्षे मी भीतीच्या छायेखाली वावरत होतो. कधी माझ्या मागे ईडी लागेल, कधी अँटी करप्शन लागेल. कधी विनयभंगासारखी केस दाखल केली जाईल, याची नेहमी भीती वाटायची. आता मी त्या केसमधून निर्दोष सुटलो आहे. या सर्वातून बाहेर आल्याने माझ्या डोक्यावरील टेंशन कमी झाले. आता एनसीपीत आलो, त्यामुळे आता इतरांना टेंशन देण्याचे काम मी सुरू करणार,' असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला.

'बहुजन मुख्यमंत्री झाला पाहिजे म्हटल्यावर चौकशा लावल्या'

खडसे पुढे म्हणाले की, 'भाजपला पुर्वी शेटजी-भटजींचा पक्ष म्हटले जायचे. पण, ही ओळख पुसण्यासाठी मी गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, अण्णा डांगें, पांडुरंग फुंडकर यासारख्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र काम केले. त्या काळापासून आम्ही काम करतोय. अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत केली. त्यामुळे शेटजी-भटजीचा जो चेहरा तो बहुजन समाजाचा चेहरा करण्याचा प्रयत्न केला. पण, 2014 नंतर मी बहुजन मुख्यमंत्री झाला पाहिजे असे म्हटल्यामुळे माझ्यामागे चौकश्या लावल्या. भाजपमध्ये बहुजनांकडे दुर्लक्ष झालंय हे मान्यच करावे लागेल', असे मत खडसे यांनी मांडले.

'पक्षात येणाऱ्यांना चंद्रकांत पाटलांनी कुल्फी आणि चॉकलेटच दिले'

खडसेंनी यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवरही निशाना साधला. खडसे म्हणाले की, 'चंद्रकांत दादांनी नाथाभाऊंना कुल्फी देणार की चॉकलेट? असा सवाल केला आहे. पण काही द्यावं किंवा देऊ नये, यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला नाही. कुल्फी आणि चॉकलेट देऊन पक्षामध्ये लोक येत असतील असं वाटत असेल तर आतापर्यंत भाजपमध्ये वेगवेगळ्या पक्षातील लोकांनी प्रवेश केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी प्रत्येकाला कुल्फी आणि चॉकलेटं दिली म्हणूनच ते पक्षात आले होते, असे त्यांच्या बोलण्यावरुन दिसते', असा टोला खडसेंनी लगावला.

'ज्या ठिकाणी माझे बळ, त्या ठिकाणी स्वतंत्र गट स्थापन करणार'

यावेळी बोलताना खडसेंनी ज्या ठिकाणी खडसे समर्थकांचे बळ आहे त्या त्या ठिकाणी भाजपच्या बाहेर राहून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा स्वतंत्र गट करणार असल्याचे सांगितले. खडसे म्हणाले की, 'ज्या ज्या ठिकाणी आमचं बळ आहे त्या त्या ठिकाणी स्वतंत्र गट स्थापन करण्याची शक्यता आहे. स्वतंत्र ताकद उभी करुन भाजपच्या बाहेर राहतील आणि राष्ट्रावादीसोबत येतील. अशी शक्यता असलेल्या काही महापालिका आहेत, काही नगरपालिका आहेत. या ठिकाणी पक्षांतर कायद्याची बाधा न येता स्वतंत्र गट स्थापन करणे शक्य होणार असेल तर अनेकांनी त्याची तयारी माझ्याकडे दाखवली आहे. नगरसेवकांची तयारी असेल तर जळगाव जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल अशा ठिकाणी हा प्रयोग पुढील कालखंडात करू,' असे खडसे म्हणाले.