आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अवकाळी पावसाच्या नुकसानीच्या पाहणीसाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर हजेरी लावली. त्यांनी नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यातल्या गावांची पाहणी केली. तसेच प्रशासनाला युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे आदेश दिल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली.
मार्च महिन्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने महाराष्ट्रात हाहाकार उडवला आहे. यावर्षी एकूण देशातला 80 टक्के अवकाळी पाऊस महाराष्ट्रात झाल्याचे समोर आले. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकणाला या पावसाने झोडपले. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
सटाणा तालुक्याचा दौरा...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल अयोध्या दौऱ्यावर होते. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. शरद पवार यांनी तर शेतकरीच आमच्यासाठी राम असल्याचे सांगितले. अयोध्या दौरा आटोपून आल्यानंतर एकनाथ शिंदे आज थेट नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. त्यांनी सटाणा तालुक्यातील निताने, बिजोटे, आखतवाडे शिवारात अवकाळी पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री दादा भुसे, आमदार दिलीप बोरसे आदी उपस्थित होते. तातडीने मदत करू, असे आश्वासन शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिले. त्यासाठी प्रशासनाला युद्धपातळीवर पंचनामे करण्यास सांगितल्याची माहिती दिली.
वाऱ्यावर सोडणार नाही...
एकनाथ शिंदे म्हणाले की, अवकाळी पावसाच्या नुकसानीची माहिती समजताच आम्ही सचिवांना फोन केले. राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन केले. युद्धपातळीवर पंचनामे होतील. पालकमंत्री घटनास्थळी भेट देतील. आतापर्यंत जेव्हा - जेव्हा शेतकरी अडचणी आले. तेव्हा सरकार त्यांच्या शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांना वाऱ्यावर सोडले नाही.
सुखाचे दिवस येऊ दे...
सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून आम्ही जाहीर केला. कांद्याचे अनुदान साडेतीनशे रुपये केले. केंद्राचे सहा हजार शेतकऱ्यांना मिळायचे. त्यात आता महाराष्ट्र सरकार सहा हजार रुपये देत आहे. शेतकरी वाचला पाहिजे. आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. या नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे होतील. बळीराजा केंद्र बिंदू आहे. तो सर्वांना जगवतो. त्याच्या आयुष्यात सुखा-समाधानाचे दिवस येऊ दे, असे साकडे प्रभू रामचंद्रांना घातल्याचे त्यांनी सांगितले.
मृतांच्या कुटुंबीयांना मदत
पारस (जि.अकोला) येथे बाबुजी महाराज संस्थानात सभामंडपावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत त्यांनी जाहीर केली असून, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. पारस येथील या दुर्घटनेत सात भाविकांचा मृत्यू झाला असून २३ जण जखमी झाले आहेत.
संबंधित वृत्तः
जबर फटका:अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या बागा उद्धवस्त; व्यापाऱ्यांना मात्र द्राक्ष गोडच, पाहा PHOTO
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.