आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्युत्तर:एकनाथ शिंदेंकडून नारायण राणेंना जोरदार प्रत्युत्तर, माझ्या नाराजीचा शोध राणेंनी कुठून लावला? माहिती नाही; पण त्यात कुठलंही तथ्य नाही

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या आरोपांवर शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

माझ्या नाराजीचा शोध नारायण राणे यांनी कुठून लावला हे मला माहिती नाही. माझ्या कामात मातोश्री किंवा मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप असल्याच्या वक्तव्यात अजिबात तथ्य नाही. मला माझ्या खात्याचे निर्णय घेण्याचे पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. मी माझ्या पक्षात आणि विभागात मोकळेपणाने काम करतो. मी समाधानी आहे. निर्णय स्वातंत्र्य असल्यामुळेच अनेक लोकहिताचे निर्णय मी आातापर्यंत घेऊ शकलो आहे. तसेच हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग देखील यशस्वीपणे पुढे नेत आहे. यामुळे नारायण राणेंच्या बोलण्यात काही तथ्य नाही, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

खाते कोणतेही असो, धोरणात्मक किंवा मोठे निर्णय मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच होत असतात. राणेंना हे चांगले माहीत आहे. उद्या त्यांना मोठ्या निर्णय घ्यावयाचा असले तरी पंतप्रधानांची संमती लागणार आहे. त्यामुळे त्यांचं वक्तव्य हे केवळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून हे संभ्रम पसरवण्याचे काम सुरू आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारचे काम उत्तमरित्या सुरू आहे. यापेक्षा अधिक बोलण्याची गरज नाही, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी यांनी नारायण राणेंचे वक्तव्य खोडून काढले आहे.

नारायण राणे काय म्हणाले होते?
'एकनाथ शिंदे यांच्या खात्यात 'मातोश्री'चा व मुख्यमंत्र्यांचा प्रचंड हस्तक्षेप आहे. त्यामुळे शिंदे कंटाळले आहेत. ते पर्यायाच्या शोधत असून लवकरच योग्य निर्णय घेतील,' असा दावा त्यांनी केला होता. राणेंच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.

बातम्या आणखी आहेत...