आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनआशीर्वाद यात्रा:रेल्वेचे विद्युतीकरण, दुहेरीकरण हे मराठवाड्याचे स्वप्न पूर्ण करू : केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांची ग्वाही

परभणी / नामदेव खेडकर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी येथे जनआशीर्वाद यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. - Divya Marathi
परभणी येथे जनआशीर्वाद यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

नांदेड-मनमाड या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण आणि दुहेरीकरण हे मराठवाड्याचे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी मी आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे प्रयत्नशील आहोत. विद्युतीकरणासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे, तर दुहेरीकरण मंजुरीच्या प्रक्रियेत आहे, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी परभणी येथे सांगितले.

भाजपची जनआशीर्वाद यात्रा गुरुवारी परभणी आणि जालना जिल्ह्यात होती. या यात्रेचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत होत आहे. जागोजागी विविध समाजांतील संघटनांकडून डॉ. कराड यांचा सत्कार केला जात आहे. परभणीत बोलताना डॉ. कराड म्हणाले, परभणीच्या मेडिकल कॉलेजसाठी राज्य शासनाने केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा. केंद्राकडून मंजूर करवून घेण्याची जबाबदारी माझी राहील.

‘मुद्रा’संदर्भात बँकिंगची बैठक : मोदी सरकार नवउद्योजकांसाठी मुद्रा लोनची योजना राबवते. १० लाख रुपयांच्या कर्जासाठी मालमत्ता तारण ठेवण्याची अट नाही. मात्र, तरीही काही बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. या पार्श्वभूमीवर बँकिंगची बैठक घेऊन सर्व पात्र अर्जधारकांना कर्ज देण्याच्या सूचना करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मोठ्या गावांमध्ये राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा उघडण्याचा मानसही डॉ. कराड यांनी व्यक्त केला.

नाना पटोलेंची उंची काय?
भाजपच्या यात्रेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली होती. यासंदर्भात डॉ. कराड म्हणाले, नाना पटोले यांची उंची काय आहे? टीका करताना त्यांनी भान ठेवावे. केवळ स्वतःच्या आणि मित्रपक्षांच्या लोकांना खुश ठेवणारे हे सरकार असून यांना जनतेशी काहीही घेणेदेणे नसल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले.

मराठवाड्यात ‘एम्स’ आणणारच
मोदी सरकार येण्यापूर्वी देशात केवळ ७ एम्स हॉस्पिटल होते. मोदींनी नवीन २२ एम्स आणले. त्यात महाराष्ट्राला एक मिळाले. ते नागपूरला गेले. आता पुन्हा देशात १२ एम्स रुग्णालये उभारण्याचा केंद्र शासनाचा विचार आहे. यापैकी एक रुग्णालय मराठवाड्याला कुठल्याही परिस्थितीत मिळवून देऊ. एका एम्स रुग्णालयासाठी जवळपास ३ हजार कोटी रुपये खर्च येतो. हे रुग्णालय मराठवाड्यात आल्यास वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती होईल, असे कराड यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...