आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आषाढी वारी:यंदाही शासकीय नियम पाळूनच करावा लागेल पंढरपूरच्या विठूनामाचा गजर

आषाढी वारी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंकलीच्या माउलींच्या मानाच्या अश्वांचे प्रस्थान यंदाही प्रतीकात्मक?

पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागलेल्या वारकऱ्यांना यंदाही कोरोनाचे नियम पाळावे लागणार असून त्यासाठी शासनाने नियमावली जाहीर केली आहे. यंदा मानाच्या दहा पालखी सोहळ्यांनाच आषाढी वारीची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान वारीत अंकली (कर्नाटक) येथून माऊलींच्या दर्शनासाठी आणि सेवेसाठी प्रस्थान ठेवणाऱ्या श्रीमंत सरदार शितोळे यांच्या मानाच्या अश्वांचे प्रस्थान मागील वर्षी अंकली येथेच करावे लागले होते. पायी वारीला परवानगी नव्हती. यंदाही अश्व ठाण बंदच राहणार असल्याचे चित्र आहे. कर्नाटक सरकारने २१ जूनपर्यंत लाॅकडाऊन जाहीर केले आहे. त्यानंतर सरकारी यंत्रणांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सरदार महादजी शितोळे यांनी सांगितले.

माऊलींच्या पालखी सोहळ्यात अंकली येथील शितोळे सरदारांच्या मानाच्या अश्वांचा सहभाग महत्त्वाचा असतो. ही परंपरा सव्वादोनशे वर्षांपासून आहे. मानाची अश्वजोडी अंकली येथून बारा दिवस आधीच प्रस्थान ठेवते. सोबत लवाजमा असतो. वाटेत शेकडो भाविक या वारीत सामील होतात. आळंदी येथील माऊलींच्या मंदिरात अश्व प्रस्थानाच्या आदल्या दिवशीच पोहोचतात. दुसऱ्या दिवशी माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत मानाचे अश्व पंढरपूरची वाटचाल करतात. गेल्या वर्षी कोरोनामुळे या सेवेत खंड पडला आणि यंदाही तशीच परिस्थिती आहे. या अश्व वारीचा निर्णय आगामी पाच दिवसांत होईल, असे शितोळे म्हणाले. अंकली ते आळंदी अंतर सुमारे ३१५ किलोमीटरचे आहे. हे अंतर एरवी अकरा दिवसांत पार करून अश्व आळंदीला पोहोचतात. यंदा आळंदी येथून माऊलींचे प्रस्थान २ जुलै रोजी होणार आहे. त्यानुसार २१ जूनपर्यंत निर्णय होणे अपेक्षित आहे, असेही शितोळे म्हणाले.

दशमीला पोहोचतील पालख्या; यात्रा कालावधीमध्ये भाविकांसाठी दर्शन बंद मानाच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये दशमीच्या दिवशी आगमन होऊन त्या पौर्णिमेला प्रस्थान करतील. शासकीय महापूजा व विठ्ठल संतांच्या भेटीस गेल्यावर्षी प्रमाणेच मान्यता देण्यात आली आहे. ‘श्रीं’चे नित्योपचार परंपरेनुसार सुरू ठेवून आषाढी यात्रा कालावधीमध्ये भाविकांसाठी दर्शन बंद असेल. संत भानुदास महाराजांचा पुण्यतिथी कार्यक्रम व श्री विठ्ठलाच्या पादुकांची मिरवणूक १ ते १५ व्यक्तींमध्येच होईल. श्री गुरुदास महाराज देगलूरकरांचे चक्रीभवनसाठी देगलूकर महाराज व अन्य चार व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. अंमळनेरकर व कुकुरमुंडेकर महाराजांसोबत दोन व्यक्तींना परवानगी दिली आहे.

हिरा-मोती अश्वजोडी सज्ज, पण...
शितोळे यांच्या वाड्यात माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत जाणारे मानाचे अश्व हिरा आणि मोती सज्ज ठेवण्यात आले आहेत. दोन्ही अश्व काठेवाडी आहेत. हिराचे वय पाच तर मोती सहा वर्षांचा आहे. दोन्ही अश्वांसोबत सरदारांचा मोठा लवाजमा असतो. गेल्या वर्षी कोरोनामुळे मानाच्या अश्वांचे आम्ही प्रतिकात्मक प्रस्थान केले होते.

रथांऐवजी असतील वाहने
महाद्वार काला उत्सव व श्री संत नामदेव महाराज समाधी सोहळ्यासाठी १+१० व्यक्तींना परवानगी मिळाली आहे. एकादशीला रथोत्सवासाठी रथाऐवजी स्वतंत्र वाहनाने १० मानकरी व मंदिर समितीचे ५ कर्मचारी अशा १५ व्यक्तींना परवानगी आहे. संतांची पादुका भेट व मानाच्या पालखीसाठी ४० वारकऱ्यांना परवानगी दिली आहे. या वर्षी दोन बसमध्ये २० प्रमाणे ४० संख्या निश्चित केली आहे. संताचे नैवेद्य व पादुकांसाठी दशमी ते पैार्णिमा असे ६ दिवस २ व्यक्तींना परवानगी असेल. विठ्ठलाची प्रक्षाळपूजा समिती सदस्यांच्या हस्ते सपत्नीक २+३ रुक्मिणी मातेची प्रक्षाळपूजा २+३, विठ्ठलाकडे ११ पुजाऱ्यांकडून श्रीस रूद्राचा अभिषेक व श्री रूक्म‍िणिमातेस ११ पुजारी पवनमान अभिषेक करतील. आषाढी एकादशीला (२० जुलै) स्थानिक महाराज अशा १९५ मंडळींना श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या मुखदर्शनाची परवानगी असेल. त्यांना वेळ व प्रवेशपत्रिका मंदिर समिती देणार आहे.

वारीसाठी शासकीय नियमावली
देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यात प्रत्येकी १०० व उर्वरित आठ सोहळ्यांसाठी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना सहभागी होता येईल, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने स्पष्ट केले आहे. मानाच्या पालख्या विशेष वाहनाद्वारे वाखरीला पोहोचल्यानंतर पंढरपूरकडे १.५ किमी. पर्यंत प्रातिनिधिक स्वरूपात पायी वारी करतील.

बातम्या आणखी आहेत...