आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी स्टंटबाज...:गडकरी यांचे काम चांगले, पण भाजप त्यांचे पंख छाटतोय; संकटकाळात महाराष्ट्राशी दुजाभाव केल्याचा आरोप

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्र सरकारमध्ये नितीन गडकरींचे काम चांगले आहे. मी त्यांचे अभिनंदनही केले आहे

‘सात वर्षांपासून सत्तेवर असलेल्या माेदी सरकारने देशातील मूळ प्रश्नांकडे कायम दुर्लक्ष केले. हॉलीवूड- बॉलीवूड- टॉलीवूडलाही लाजवत केवळ स्टंटबाजी, इव्हेंट मॅनेजमेंट करत सभा घेण्याचेच काम माेदींनी केले. त्याच वेळी लोकशाही मूल्यांची गळचेपी करत तपास यंत्रणांचा गैरवापरही या सरकारने माेठ्या प्रमाणावर केला, अशी टीका काँग्रेसचे नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी केली. नितीन गडकरी हे कार्यक्षम मंत्री असले तरी भाजपमधूनच त्यांचे पंख छाटले जात आहेत, असा आराेपही चव्हाण यांनी आॅनलाइन पत्रकार परिषदेत केला.

माेदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त अशाेक चव्हाणांनी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधत काँग्रेसची भूमिका मांडली. या वेळी प्रदेश काँग्रेस सेवादलाचे मुख्य संघटक विलास औताडे, जिल्हा अध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहर अध्यक्ष हिशाम उस्मानी, प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील आदी आॅनलाइन सहभागी झाले हाेते.

‘सात वर्षांच्या माेदी सरकारच्या काळात खाेट्या आश्वासनांशिवाय काहीच मिळाले नाही. निवडणूक असतात तेव्हा माेदी त्या राज्यात माेठ्या सभा घेतात, नंतर मात्र तिकडे पाहत नाहीत. महाराष्ट्र व गुजरातला वादळाचा फटका बसला. माेदी गुजरातमध्ये जाऊन पाहणी करून आले, मात्र आपल्या राज्यात आलेच नाहीत. त्यांनी मदतही केवळ गुजरातलाच केली. रेमडेसिविर इंजेक्शन, लसींच्या पुरवठ्याबाबतही त्यांनी महाराष्ट्राबाबत दुजाभाव केला, असा आराेपही चव्हाण यांनी केला.

कोरोनाच्या काळात केंद्र सरकारची अकार्यक्षमता, अति आत्मविश्वास आणि अति उत्साह आंतरराष्ट्रीय पातळीवर चव्हाट्यावर आला. स्मशानात अहोरात्र जळणाऱ्या चिता आणि गंगेत वाहणाऱ्या शेकडो शवांची आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये येणारी छायाचित्रे व त्यातून हाेणारी देशाची अप्रतिष्ठा पाहून एक भारतीय म्हणून मनाला प्रचंड वेदना होतात, अशी खंतही चव्हाण यांनी व्यक्त केली.

गडकरी राइट पर्सन अन‌् राँग पार्टी
केंद्र सरकारमध्ये नितीन गडकरींचे काम चांगले आहे. मी त्यांचे अभिनंदनही केले आहे. त्यांचा पक्ष व आमच्यात मतभेद असले तरी इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही गडकरींचा सर्वांशी चांगला संवाद आहे. मात्र त्यांच्याच पक्षात गडकरींचे पंख छाटण्याचे काम सुरू आहेत. त्यांचे अधिकार कमी केले जात आहेत. त्यांचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसते. त्यामुळे गडकरी ‘राइट पर्सन इन राँग पार्टी’ असेच म्हणावे लागेल, असा टाेला अशाेक चव्हाण यांनी लगावला.

बातम्या आणखी आहेत...