आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरीप धोक्यात:सोयाबीन आणि कपाशीवरील किडीने बळीराजाचेच ‘शोषण’; मावा, फुलकिडे, तुडतुडे व ‘स्पोडोप्टेरा लिट्युरा’ अळीचा प्रादुर्भाव वाढला

परभणी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वातावरणातील बदलामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला

यंदाच्या खरीप हंगामात पावसाला चांगली सुरुवात झाली आहे, तर मराठवाड्यात शेतकऱ्यांनी लाखो हेक्टरवर पेरण्या केल्या. पण सुरुवातीला अतिवृष्टीचा पिकांना फटका बसला. त्यानंतर मधल्या काळात जवळपास तीन आठवडे पावसाने दडी मारली, पुन्हा जोरदार पाऊस बरसला. सततच्या बदलणाऱ्या वातावरणामुळे खरीप हंगामात मोठे नुकसान होत अाहे. विशेषत: सोयाबीन व कपाशीवर कीड रोग व रस शोषण अळीमुळे पिकांची उत्पादकता घटून बळीराजाचेच शाेषण हाेण्याची शक्यता निर्माण झाली अाहे.

सध्या सोयाबीन पिकावर स्पोडोप्टेरा लिट्युरा (तंबाखूवरील पाने खाणारी अळी), उंट अळी व केसाळ अळीचा प्रादुर्भाव आहे. यामुळे सोयाबीनचे ६०-७० टक्के नुकसान होऊ शकते. फक्त उंट अळीमुळे ५० टक्क्यांपर्यंत सोयाबीनचे नुकसान होऊ शकते, तर कपाशीचे पीक सध्या पाते व फूल अवस्थेत आहे. जूनमध्ये सुरुवातीला लागवड केलेल्या पिकात बोंडे परिपक्वतेच्या अवस्थेत आहेत. सध्या हवामान बदलामुळे कपाशीत पातेगळ झाल्याचे दिसते. तसेच रस शोषण करणाऱ्या किडी जसे, मावा, तुडतुडे, फुलकिडे यांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून येत आहे. काही ठिकाणी बोंडअळीचाही प्रादुर्भाव दिसून येतो. कीड रोगामुळे उत्पन्नात घट होऊ शकते.

दिव्य मराठी एक्सप्लेनर - डॉ. गजानन गडदे, समन्वयक, विस्तार कृषी विद्यावेत्ता, वनामकृवी, परभणी.
सोयाबीन, कपाशीवर का होतोय कीडरोगाचा प्रादुर्भाव?

सततच्या वातावरण बदलामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. यंदाच्या वर्षी मान्सूनने जाेरदार आगमन केले. त्यानंतर मोठा खंड पडला आणि पुन्हा पावसाला सुरुवात झाली. विशेषत: “स्पोडोप्टेरा लिट्युरा’ या अळीला हे वातावरण पोषक असल्याने पिकांवरील प्रादुर्भाव वाढला. शिवाय ऑगस्ट ते ऑक्टोबरमध्ये “स्पोडोप्टेरा’चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येतो.

कीड नेमके कसे नुकसान करते?
स्पोडोप्टेरा अळी दिवसा पानाखाली अथवा जमिनीत लपून राहते. रात्रीच्या वेळी बाहेर पडते. अंड्यातून निघालेल्या अळ्या समूहाने राहून प्रथम अंडी घातलेल्या पानाचे हरितद्रव्य पूर्णपणे खाऊन टाकतात. परंतु, पानास छिद्रे पाडत नाहीत. त्यामुळे अशी पाने पातळ पांढऱ्या कागदासारखी दिसतात. अळ्या माेठ्या झाल्यानंतर सर्व शेतात पसरतात व पानास छिद्र पाडून पाने खातात. फुले लागल्यानंतर बऱ्याचदा त्या फुलेसुद्धा खातात, तर उंटकिडीच्या अळ्या पानांच्या खालचा हिरवा भाग खरवडून खातात. त्यामुळे पानांचा फक्त वरचा पांढरा पापुद्रा दिसतो. काही काळानंतर असे पातळ पापुद्रे फाटतात व त्या ठिकाणी छिद्रे दिसतात. मोठया अळ्या पानांना छिद्रे पाडून खातात. त्या फुले व शेंगाही खातात.

उत्पादनावर काय परिणाम हाेणार?
सोयाबीनवर उंटअळी व स्पोडोप्टेरा, तर कपाशीवर मावा, तुडतुडेचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सध्या पिके फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत असून त्यावर या किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे उत्पादनात घट होऊ शकते. शेतकऱ्यांनी या किडीच्या व्यवस्थापनासाठी तज्ज्ञांनी सुचवलेल्या उपाययोजना कराव्यात.

काय करता येतील उपाय?

  • सोयाबीनवरील “स्पोडोप्टेरा’च्या सर्वेक्षणासाठी एकरी २ कामगंध सापळे शेतात लावावेत.
  • शेतामध्ये पक्ष्यांना बसण्यासाठी टी आकाराचे ८ -१० प्रति एकरी पक्षी थांबे उभारावेत.
  • “स्पोडोप्टेरा’च्या व्यवस्थापनासाठी ४० ग्रॅमनो मुरिया रिलाई बुरशी प्रति १० लिटर पाण्यात मिसळून सायंकाळच्या वेळी फवारणी करावी.
  • तरीही अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्यास फ्लुबेंडियामाइड ३९.५ एससी १ मिली प्रति १० लिटर पाण्यात किंवा ४० मिली प्रतिएकर या प्रमाणात फवारणी करावी.
  • उंटअळी, केसाळ अळी व पाने खाणारी अळीच्या नियंत्रणाकरिता क्लोरँट्रानिलीप्रोल १८.५० एससी ३ मिली प्रति १० लिटर पाणी किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल ९.३ % प्लस लॅमडा सायहॅलोथ्रीन ४.६ % झेड.सी याप्रमाणे फवारणी करावी.
  • कपाशीतील फुलगळीच्या व्यवस्थापनासाठी नॅपथेलिन अॅसिटिक अॅसिड २.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

बातम्या आणखी आहेत...